एसटी बसवर दगड फेक करुन चालक – वाहकास मारहाण करणाऱ्याला सश्रम कारावासाची शिक्षा !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील प्रवरा नदीच्या पुलाजवळ एसटी बस जवळ आल्याच्या रागातून बसवर दगडफेक करीत चालक व वाहकास मारहाण करणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय संगमनेरचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी ३ महिने सश्रम कारावासासह १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अफजल अन्सार पठाण राहणार नाईकवाड पुरा संगमनेर अशी शिक्षा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

दिनांक २ सप्टेंबर २०१५ रोजी नाशिकहून पलूस कडे (सांगली) बस क्रमांक एम एच १४ बीएन ४२३९ ही बस संगमनेर होऊन पलूस कडे जात असताना प्रवरा नदीच्या पुलाजवळ रस्ता ओलांडत असताना आरोपीच्या जवळ ही बस गेल्याने आरोपी अफजल पठाण यास राग आला.

त्याने एसटीवर दगड फेकून मारले. बस थांबल्यानंतर आरोपीने बसच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसून दोघांना मारहाण केली. तसेच वाहकाच्या हाताला चावा घेतला. मारहाण शिवीगाळ या प्रकरणी आरोपीवर संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार इस्माईल शेख यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी होऊन आरोपी अफजल अन्सार पठाण याला दोषी धरून त्यास तीन महिने सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या कामी सरकारी वकील म्हणून संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवलदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली दवंगे, स्वाती नायकवाडी, नयना पंडित, प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!