संगमनेरातील डॉक्टर सावंत यांच्या घरातून तब्बल अर्धा किलो सोन्याची चोरी !

प्रतिनिधी —

नवीन नगर रस्त्यावर असलेल्या हृदयरोग तज्ज्ञ  डॉ. गिरीश सावंत यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर सावंत यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सावंत यांचे नगर रोडवरील ताजणे मळ्यात ‘साई सुमन हृदयालय व क्रिटिकल केअर सावंत हॉस्पिटल’ आहे. या रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सावंत आपल्या कुटुंबासह राहावयास आहेत.

शनिवारपासून (2 सप्टेंबर) डॉ. सावंत कुटुंबीय बाहेरगावी गेलेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीतून घरात प्रवेश मिळविला. घरातील वस्तूंची-सामानाची उचकापाचक करत चोरट्याने कलकत्ता मंगळसूत्र, कॉलर नेकलेस, पॅण्डल, राधेय नेकलेस, स्टड इयर रिंग्स, गळ्यातील चैन, गळ्यातील वाट्या, मणी व सोन्याचे कॉइन असा पोलीस दप्तरी नमूद करण्यात आलेले १५ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

बाहेर गावाहून परतल्यानंतर सावंत कुटुंबियांच्या हा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर डॉ. सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दागिने चोरीचे सत्र सुरू असतानाच आता डॉक्टरच्या घरातून तब्बल अर्धा किलो वजनाचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार समोर आल्याने दागिने चोर शोधण्याचे आव्हान शहर पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!