संगमनेरात पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याच्या व्हायरल पोस्टमुळे खळबळ !
झेंडा पाकिस्तानचा नाही पोलिसांकडून खुलासा !
प्रतिनिधी —
काही महिन्यांपूर्वी शांतता व कायद्याचा प्रश्न उभा करणारी घटना संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात झाली होती. मुस्लिम समाजाच्या एका टोळक्याने हिंदू तरुणांना बेदम मारहाण केल्याने संगमनेरातील शांततेचे वातावरण बिघडले होते. त्यानंतर संगमनेरात निषेध म्हणून सकल हिंदू समाजाचा मोर्चा देखील निघाला होता.

समनापुर येथे झालेली दगडफेक यामुळे प्रकरण आणखीच चिघळले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई करून आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः हस्तक्षेप करून संगमनेर शहरातील शांतता अबाधित ठेवली होती.

आज पुन्हा त्याच जोर्वे नाक्यावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याची अफवा सोशल मीडिया वरून व्हायरल करण्यात आली. त्यामुळे सोशल मीडियातून आलेल्या या अफेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. काही लोकांनी जोर्वे नाक्यावर सदर झेंडा पाहण्यासाठी चकरा मारल्या. वातावरण पुन्हा चिघळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पुढील सर्व परिस्थितीचा अंदाज घेता संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी तातडीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून संगमनेर करांना शांततेचे आवाहन केले आहे.

शहरातील जोर्वे नाका परिसरात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याची अफवा असून तसा कुठलाही प्रकार झालेला नाही. तो झेंडा इस्लामचा धार्मिक झेंडा आहे आणि तो नगरपालिकेच्या वतीने काढून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले असून अफवा पसरवण्यांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

