दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
अध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालक मंडळासह नातेवाईकांनी पतसंस्थेचे सुमारे ८१ कोटी रुपये लुटले…
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील नावाजलेली आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत इतर आरोपी मात्र पसार झाले असल्याचे समजते.

सुमारे दोन वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. सतर्क सभासदांचे, ठेवीदारांचे विविध प्रकारचे आंदोलन निवेदने यामुळे दूधगंगा अपहार प्रकरण शहरासह तालुक्यात गाजत होते. आरोप प्रत्यारोप आणि आश्वासने यांची देवाण-घेवाण चालू होती. कायदेशीर कारवाई मात्र होत नव्हती. नुकतीच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शासकीय परवानगी मिळताच पतसंस्थेच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीतील पतसंस्थेच्या व्यवहारांचे फेर लेखा परीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणांमध्ये आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह नातेवाईकांनी ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काँग्रेसचे माजी जिल्हापरिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे (रा. गणपती मळा सुकेवाडी), भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा.संगमनेर), भाऊसाहेब संतु गायकवाड (मयत) (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन नागराज बाबा कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर, औरंगाबाद), दादासाहेब भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), अमोल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), विमल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), शकुंतला भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), सोनाली दादासाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के. बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी वरील २१ व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०८, ४०९, ४६५, ४६७, ४७१, ४७७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

