दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी मॅनेजरला अटक

मुख्य आरोपी चेअरमन आरोपी असलेल्या मुले, सुना आणि पत्नीसह पसार..

प्रतिनिधी —

संगमनेरच्या सहकार विश्वाला बदनाम करणाऱ्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या मुख्य आरोपींपैकी व्यवस्थापकाला अटक केली आहे. राजकीय वरदहस्त असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आरोपी नातेवाईकांसह अन्य आरोपी पसार झाला आहे. पोलीस आरोपींच्या मागावर असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.

दूधगंगा पतसंस्थेच्या अपहार गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असलेला आणि स्वतः कोट्यावधी रुपयांची रक्कम मिळवलेला व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे.

पतसंस्थेत असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी, नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य खर्च, व्यक्तिगत खर्च, व्याजाच्या रकमा नावे करणे अशा विविध माध्यमातून अक्षरश: ८१ कोटी रुपये लुटणारी ही टोळी उघड झाली आहे. यात दोन सनदी लेखापाल देखील सहभागी झाले असल्याचे उघड झाले आहे. मॅनेजर, अकाउंटंट, चेअरमन यांच्यासह चेअरमनची मुलं, सुना, पत्नी व इतर नातेवाईक यांनी संगणमताने संस्थेची रक्कम लुटली असल्याचे समोर आले आहे.

संगमनेरच्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बँकेच्या तीन कॅशियरसह लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यांना येत्या २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता पोलिसांनी बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला अटक केली आहे. गुंजाळ याला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. गुंजाळ हा या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक आरोपी आहे. पतसंस्थेतील हा घोटाळा काही ठराविक व्यक्तीभोवती केंद्रित झाला आहे.

संस्थेचा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीप अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह सतरा जणांनी तब्बल ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार केला असून याप्रकरणी त्यांना सहा आरोपींनी मदत केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन २०१६ ते २०२ पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल २१ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अध्यक्ष त्यांच्या नातेवाईकासह बहुतांशी आरोपी फरार झाले असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नाशिक येथून लेखापरीक्षक अमोल प्रकाश क्षीरसागर याला तर संगमनेरमधून गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तिघांना अटक केली होती.

भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र (सोनाली दादासाहेब कुटे), अमोल ट्रेडिंग कंपनी (दादासाहेब भाऊसाहेब कुटे), श्री डेव्हलपर्स (संदीप भाऊसाहेब कुटे), कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम, संदीप दगडू जरे या सतरा जणांनी अपहार केला असून याप्रकरणी त्यांना लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे उल्हासराव साहेब थोरात सोमनाथ कारभारी सातपुते या कॅशियर सह अरुण बुरड व अमोल शिरसागर या सहा जणांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!