संगमनेरच्या अवैध कत्तलखान्यावर नगरच्या गुन्हे शाखेचा छापा !
गोवंश मांस, वाहनासह मुद्देमाल जप्त ; एकाला अटक
प्रतिनिधी —
संपूर्ण महाराष्ट्रात कु-प्रसिद्ध असणाऱ्या संगमनेर शहरातील अवैध कत्तल खाण्यांचा बोलबाला सगळीकडे आहे. हे कत्तलखाने कधीच बंद होत नाहीत. या ठिकाणी होणारी गोवंश हत्या सातत्याने सुरूच असते. कितीही छापे टाका कोणतीही कारवाई करा कत्तलखाने चालवणारे कसाई कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये काहीतरी त्रुटी राहत असाव्यात आणि त्याचा फायदा हे बेकायदेशीर कत्तलखाने चालविणारे कसाई घेत असावेत असे दिसून येते.

संगमनेर शहर पोलीस, उपअधीक्षक यांचे पथक या कत्तलखान्यावर अधून मधून वेळ भेटेल तसा छापा टाकत असतात. सातत्याने कारवाई मात्र होत नाही किंवा कत्तलखाने कायमचे बंद करण्यास कुठलीही ठोस कृती केली जात नाही. आता थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरात येऊन शहरातील जमजम कॉलनी येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकला आहे.

जुना जोर्वे रोड, जमजम कॉलनी, संगमनेर या ठिकाणी कारवाई करुन ६०० किलो गोमांस व तुकडे, एक सत्तुर, एक सुरा व एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण ४ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुलहमीद अहेमद कुरेशी व महंमद समशाद आलम शेख (फरार) दोन्ही (रा. जमजम कॉलनी, जुना जोर्वे रोड, ता. संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल कुरेशी यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अब्दुल कुरेशी (रा. जुना जोर्वेरोड, संगमनेर) हा महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करुन, गोमांस एका छोटा हत्ती टेम्पोत भरत आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन आडबल, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, पोलीस शिपाई बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव या पथकाने ही कारवाई केली आहे.

