पाठलाग करून गोरक्षकास बेदम मारहाण ! 

पोलिसांकडून आरोपींना खास ट्रीटमेंट..

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

गोरक्षकाचा पाठलाग करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात ही घटना घडली आहे. या चार संशयितांना पेठवडगाव पोलिसांकडून विशेष ट्रीटमेंट पुरवण्यात आली असल्याचे समोर आले असून पोलिसांविषयी अनेक शंका कुशंका उपस्थित होत आहेत. न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये आणले असता, पोलिसांच्या परवानगीने मोबाईल पुरवण्यात आला. त्यामुळे पोलिसांसमोर थाटामध्ये संशयित मोबाईलवर गप्पा मारत होते.

चार दिवसांपूर्वी किणी टोल नाका येथे एका गोरक्षकास तीन ते चार जणांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर कारागृहात सोडण्यापूर्वी संशयितांना बुधवारी वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते.

सीपीआरमध्ये पोहोचताच संशयितांना नातेवाईक आणि मित्रांनी गराडा घातला. पोलिसांच्या परवानगीने संशयितांना मोबाईल उपलब्ध झाले. वैद्यकीय चाचणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संशयितांच्या मोबाईलवरून गप्पा सुरू होत्या. बेड्या घातलेल्या संशयितांना पोलिसांकडून मिळत असलेली विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आश्चर्यचकित झाले. त्यामुळे पोलीस कोठडीत चौकशी झाली की, नुसताच फार्स करण्यात आला, अशी शंका उपस्थित झाली आहे. घडल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांकडून पाठराखण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!