संगमनेरात स्वातंत्र्यदिनी सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा !

पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

प्रतिनिधी —

पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने स्वातंत्र्यदिनी सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांच्या गोमांसासह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून कारवाई दरम्यान कत्तलखाना चालक आणि वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान यातील तिघा आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्याचा प्रश्न सरकारपर्यत जावूनही कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या सरकार आणि प्रशासनाला येथील कत्तलखाने बंद करण्यात अपयश आले आहे. येथील कत्तलखाने राजरोसपणे स्वातंत्र्यदिनाच्या दिवसासह धार्मिक सणाच्यादिवशीदेखील सुरुच असतात. त्यांच्यासाठीचा प्रशासनाचा बंदी आदेश कागदावरच असतो. कोणत्याही आदेशाला आणि कारवाईला न जुमानणाऱ्या कत्तलखाना चालकांकडून बंदी असलेल्या गोवंश जनावरांच्या कत्तली खुलेआम सुरु असल्याचे वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईतून समोर येत आहे.

संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना स्वातंत्र्यदिनी संगमनेरमधील मदिनानगरमधील बेकायदा कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची रात्री माहिती मिळाली होती. वाघचौरे यांनी लगेचच पोलीस कर्मचारी सारबंदे आणि डोके यांना घटनास्थळी पाठविली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे शेख शाहीद हाफीज याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच तेथे उभ्या असलेल्या एमएच ०४ डीजे ८१२९ या इनोव्हा कारमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल केलेले गोमांस आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या मांसाची मोजदाद केली असता बाजारभावाने त्याची किंमत १ लाख ४० हजार रुपये रुपये असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय चार लाख रुपये किमतीची इनोव्हा पोलिसांनी ताब्यात घेतली. विशेष म्हणजे पोलिसांचा छापा पडताच कारवाई दरम्यान नेहमीप्रमाणे आरोपी घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती मिळाली.

दरम्यान पोलीसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शेख शाहीद हाफीज (रा. मदिनानगर, संगमनेर), मुदस्सर अब्दुल एलीस हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व मोहमंद साहील कुरेशी या तिघांविरोधात भारतीय दंड विधान कलम २६९, ४२९ सह महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ५ (अ), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याकडून देण्यात आली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!