जलजीवन मिशन योजनेचे पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद !

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी —

शासनाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तब्बल ४३ लाख रुपयांच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आणण्यास अहमदनगरच्या गुन्हे शाखेला यश आले. गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन या टोळीचा छडा लावला. तसेच चोरी गेलेल्या पाइपापैकी सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे पाईप हस्तगत करण्यात यश मिळाले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व वीस गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. या कामावरील ४३ लाख ५ हजार ५२३ रुपये किमतीचे लोखंडी पाईप कोणीतरी चोरून नेले. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्यामार्फत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे साईट इंजिनिअर सचिन रेवगडे यांनी फिर्याद दिली होती.

संगमनेर पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस यासंदर्भात समांतर तपास करत होते. मुख्य आरोपी शिवकुमार नानकऊ सरोज (रा. गौरीयाबाद, गौरीगंज, उत्तर प्रदेश) याच्यासह अरशद हसन खान (राजस्थान), मोबीन जगमाल खान, अहमद उस्मान खान, खलीलमोहम्मद इसराइल खान, सुनील रामअवतार कुमार, खुर्शीद मंगल खान, मोहम्मद अरिफ जोरमल, तय्यब मंगलखान (सर्व रा. मेवात, हरियाणा), हासिम बसरू खान, अलीम करीउद्दीन खान, मोहम्मद अफजल जोरमल (तिघे रा. नूह, हरियाणा) व बबलू (पूर्ण नाव माहित नाही- फरार) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ३५ लाख रुपये किमतीचे ३६७ लोखंडी पाईप हस्तगत करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या चोरीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेवरून आहेर यांच्या नेतृत्वाखालील सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, संतोष लोंढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जात या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी या घटनेतील आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्यांनी चोरीची व संगमनेर येथून चोरी केलेले पाईप तीन ट्रकमध्ये भरून नेले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!