विद्यार्थी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय –
संगमनेर बस स्थानकातून बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द !
प्रतिनिधी —
गुरुवारी शिर्डी मध्ये होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या संगमनेर डेपोतील तब्बल ६२ एसटी बसेस या सरकारी कार्यक्रमाच्या दिमतीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याने गुरुवारी विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी संगमनेर डेपोतील एसटी बसेस वापरल्या जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजला जायचे नाही का? ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी प्रवास करायचा नाही का? असे प्रश्न छात्र भारती या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांनी उपस्थित केले आहे.

घुले म्हणाले, गुरुवारी एसटी बसेसच्या ग्रामीण भागातील पूर्णतः आणि जिल्हा अंतर्गत व मोठ्या शहरातील बहुतांशी फेऱ्या आगारप्रमुखांनी रद्द केल्याने सरकारला या मुलांच्या शिक्षणाबद्दल गांभीर्य आहे का? एसटी बसेस बंद झाल्या तर 70 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाही. एसटी बस बंद असेल तर मुलींचे शाळा महाविद्यालय थेट बंद होते. सरकारने शालेय मुलांचे नुकसान करून एसटी बसेस वापरण्यापेक्षा खाजगी प्रवासी गाड्यांची व्यवस्था का केली नाही.

बसेस बंद राहणार असल्याने मुलांच्या पासचा उपयोग होणार नाही. उलट त्यांना खासगी गाड्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून विद्यार्थी प्रवाशांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी घुले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. या खर्चाचा भार काही अंशी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडला आहे. तलाठी कोतवाल सर्कल यांच्याकडून देखील यासाठी पैसे गोळा केले जात असल्याची चर्चा संगमनेरमध्ये सुरू आहे.

