गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना जबरदस्ती केली तर…..
पोलीस आयुक्तांचा इशारा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
श्री गणेश आगमनाला काही दिवस उरले आहेत. त्यासाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. लहान मोठे व्यापारी, दुकानदार, उद्योग व्यवसायिक आणि घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नका,’ असा सल्ला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंडळांना दिला आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी आल्यास गुन्हे दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाचा सर्व क्षेत्रांना बसलेला फटका आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यामुळे शहरातील काही मंडळांनी वर्गणी गोळा केली नव्हती. मात्र, आता व्यवसाय पूर्वपदावर आले आहेत. वर्गणीत वाढ न केल्याने यंदाच्या वर्षी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी वाढवून देण्याचा उद्योग व्यवसायिक, छोटे-मोठे व्यापारी आणि दुकानदारांकडे आग्रह धरला आहे. तर गेल्या वर्षी इतकीच किंवा त्यापेक्षा कमी वर्गणी आकारावी, अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे.

केवळ गणेशोत्सवच नाही, तर दहीहंडी, नवरात्र, तसेच महापुरुषांच्या जयंतीसाठीही वर्गणी द्यावी लागते. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील नागरिकांकडून वर्गणी घ्यावी. एमआयडीसीमध्ये कंपन्या आहेत, म्हणून आमच्याकडे येऊ नका. आम्ही ज्या ठिकाणी राहतो, तेथेही वर्गणी द्यावी लागते. उद्योजक देतील तेवढी वर्गणी घ्यावी. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार आणि दहा हजारांसाठी आग्रह धरू नये. अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नागरिक, व्यावसायिक, व्यापारी देतील तेवढीच वर्गणी घ्यावी. वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, वर्गणीबाबत जबरदस्ती केल्यास आणि याबाबत तक्रार आल्यास संबंधित मंडळांवर गुन्हा दाखल केला जाईल.
– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

