छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरण फलकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध
जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण – ना. विखे पाटील
प्रतिनिधी —
छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामकरण फलकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धारशिव करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज घेतला आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण झल्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर व धाराशिव विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव अशी नामकरणाची अंतिम अधिसूचना महसूल विभागामार्फ़त काढून ती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

“औरंगाबाद” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “छत्रपती संभाजीनगर” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच “उस्मानाबाद” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “धाराशिव” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

