संगमनेर शांतता समितीची बैठक ;
पोलिसांच्या त्याच त्याच सूचना आणि नागरिकांच्याही त्याच त्या मागण्या !
शांतता समितीची बैठक म्हणजे निव्वळ दरवर्षीचा रतीब !
प्रतिनिधी —
सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणपती उत्सव आला की रातीब घातल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीच्या बैठकीच्या पाट्या टाकल्या जातात. या बैठकीमध्ये ठरणाऱ्या कुठल्याही महत्वपूर्ण बाबींवर कायमस्वरूपी कृती होताना दिसत नाही. पोलिसांना गणेशोत्सवाचे दहा दिवस शांततेत काढून घ्यायचे असतात आणि उपस्थित नागरिकांना व पुढार्यांना सूचना मांडण्याचे काम करणे एवढेच एक कायमस्वरूपीचे भव्य दिव्य काम करावे लागते.

संगमनेर शहराची शांतता समिती ही नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे. शांतता समितीत अशांतता निर्माण करणाऱ्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. असे अनेक आरोप झालेले आहेत. संगमनेरच नव्हे तर राज्यातल्या सर्व शांतता समित्यांमध्ये अशांतता निर्माण केलेले अनेक गुंड प्रवृत्तीची मंडळी सदस्य म्हणून सहभागी असते. शांतता समितीची यादी सरकारी सूचनाप्रमाणे आणि नियमानप्रमाणे कधीही अपडेट केली जात नाही. शांतता समितीचे इतिवृत्त कधीही व्यवस्थित लिहिले जात नाही किंवा त्या इतिवृत्तावर कधीही अंमलबजावणी केली जात नाही.

आज संगमनेर शहरात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक सुरू झाली आणि ही बैठक पुन्हा एकदा इतिवृत्त वाचन, मागील इतिवृत्त, मागील सूचना यावरच रेंगाळली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलिसांना याबाबत ठोस कृती करता आलेली नाही. इतिवृत्ता मध्ये काय मांडले आहे ? आपण वर्षभर काय करणार आहोत ? शांतता समितीच्या बैठकीचे फलित काय ? याबाबत ना पोलिसांना काही घेणं देणं आहे. ना शांतता समितीच्या सदस्यांना. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गणेशोत्सव शांततेत आणि नेहमीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने कसा पार पडेल, पोलिसांच्या परवानग्या कशा मिळतील, पोलिसांच्या कचाट्यात आपली मंडळी कशी सापडणार नाहीत. यासाठी मौन बाळगून बसावे लागते.

संवेदनशील संगमनेर शहरांमध्ये नेहमीच उत्सवांच्या वेळी शांतता समितीच्या बैठकांना उधाण आलेले असते. आता या बैठका फक्त नावापुरता राहिल्या आहेत. पोलीसही रेकॉर्ड करायचे म्हणून या बैठका घेतात. त्याचे फलित मात्र कायमस्वरूपी काहीही निघत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्व शांतता समित्यांच्या बैठकांमध्ये ज्या ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याचे चित्र आजच्या बैठकीने दाखवून दिले.

गणेशोत्सवात रस्त्यावर पडलेले खड्डे, सातत्याने आणि अखंडित वीज पुरवठा व्हावा, गणेश विसर्जन मार्ग स्वच्छ आणि खड्डेविरहित असावा या महत्त्वाच्या त्याच त्याच मागण्या सर्व गणेश मंडळे आणि उपस्थित प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी यांनी केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्या केल्या जात आहेत. त्यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गणेशोत्सव मंडळांना पुरवण्यात येणारा वीज पुरवठा कसा असावा, मंडळाने तो कसा घ्यावा याच्याही सूचना नेहमीप्रमाणे दिल्या गेल्या. डीजे, वाजंत्री याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांचे कायदे याच्याही सूचना वजा धमक्या देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी वारंवार दरवर्षी या बैठकांमध्ये होत असते.

त्याचप्रमाणे गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदी पात्रात पाणी असेल की नाही, पाण्याचे संकट निर्माण होईल की नाही. याबाबत ही चर्चा घडत होत्या. आता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा एक प्रकार पुढे आल्याने नदी पात्रात पाणी असो नाहीतर नसो. कृत्रिम हौदात गणपती बुडवण्याची प्रथा सुरू झालेली आहे. यावर्षीच्या बैठकीचे फलित देखील फक्त मागील प्रश्नांची आणि मागील मागण्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवणे एवढा एकच प्रकार दिसून आला आहे. बाकी शांतता समितीची परिस्थिती जैसे थे आहे. आता पुढची बैठक नवरात्र उत्सवात होणार आणि पुन्हा तेच ते…

