अपहार प्रकरणी दूधगंगा पतसंस्थेच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास परवानगी !

चेअरमन, मॅनेजरसह इतरही अडचणीत

प्रतिनिधी —

येथील अर्थकारणात अग्रेसर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या मोठ्या आर्थिक अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हा उपनिबंधाकडून विशेष लेखापरीक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि राजकीय नेते भाऊसाहेब कुटे यांना देखील या प्रकरणी दोषी धरण्यात आले असून आरोपींमध्ये त्यांचा देखील रहाण्याची शक्यता आहे.

गुन्हे दाखल करण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आता गुन्हा केव्हा दाखल होतो याकडे ठेवीदार सभासदांचे लक्ष लागले आहे. या संस्थेत ठेविदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. नेमका किती रुपयांचा अपहार आहे याची अद्याप सहकार विभागाकडून स्पष्टता नसली तरी कोट्यावधी रुपयांच्या घरात हा अपहार असून सुमारे 98 कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे बोलले जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमकी अपहाराची रक्कम समोर येणार आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक अपहाराच्या कारणावरून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत आहे. राजकीय पाठबळामुळे या संस्थेतील गैरव्यवहार अद्याप समोर येत नसल्याचे बोलले जात होते. तसेच अपहर करणाऱ्यांची नावे देखील गुलदस्त्यात आहेत. जिल्हा उपनिबंधकांनीच आता या संदर्भात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिल्याने या प्रकरणातील सर्वच आरोपी समोर येण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ आणि चीफ अकाउंटंट यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

मध्यंतरीच्या काळात अचानकपणे या संस्थेचे व्यवहार बंद करण्यात आल्याने तसेच संस्थेला कुलूप लावण्यात आल्याने संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याची चर्चा सभासद तसेच ठेविदारांमधून सुरू झाली होती. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी देखील पतसंस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक अपहार केल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याचे जाहीर केले. या संदर्भात कुटे यांनी शहर पोलीस व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!