संगमनेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ !

दोन दिवसात दोन लाखाचे सोने लंपास..

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात मोटरसायकल चोरी, पाण्याच्या मोटारी, केबल, वाहनांच्या चोऱ्या सुरू असताना चोरट्यांनी सोने चोरीचा धुमाकूळ घातला आहे. शहरात दोन ठिकाणी चोऱ्या करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. या चोरट्यांमध्ये महिलांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

संगमनेर शहरातील अशोक चौकात असलेले आणि नावाजलेले काजळे ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानातून दोन अज्ञात महिलांनी सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या आहेत.

या संदर्भात पोलिसांना फिर्याद देण्यात आलेली आहे अशोक चौकातील माधव गंगाधर काजळे अँड सन्स या दुकानातून २४ ग्राम ८०० मिली वजनाच्या सोन्याच्या बांगड्या १ लाख ३७ हजार ६४० रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या दोन अज्ञात महिलांनी भर दुपारी चोरून नेल्या आहेत. या संदर्भात तेथील कर्मचारी रमेश नामदेव वाळुंज यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर नेहमीप्रमाणे संगमनेर बस स्थानकावरून एका महिलेचे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. वैशाली विजय कांबळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. संगमनेर बस स्थानकातून सदर महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

दोन दिवसाच्या फरकाने घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांनी शहरात सोने चोरीचा जो धुमाकूळ घातला आहे तो उघडकीस आला आहे. शहरात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ आणि त्यावर कारवाई करण्यास पोलीस अपयशी ठरत आहेत. शहरांमध्ये सर्व ‘अवैध धंदे ‘अगदी जोमाने सुरू आहेत त्यांच्यावरही कारवाई होत नाही. त्यातच चोरट्यांना देखील ‘सुगीचे दिवस ‘आले असल्याचे चित्र आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!