मोकळ्या जागांचा, मैदानांचा दारू पार्टीसाठी वापर करणाऱ्या तळीराम, गर्दुले, गांजाफुक्यांवर पोलिसांची कारवाई !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील विविध मोकळ्या जागा, मैदाने, नदीपात्र यांचा रात्री वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करण्यासाठी वापर करणाऱ्या तळीराम, गर्दुले, गांजाडी लोक यांच्या त्रासाच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने करण्यात येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने शहर पोलिसांनी तळीरामांवर कारवाई केली आहे.

संगमनेर शहरातील विविध मोकळ्या जागा, मैदाने, उपनगरातील मोकळ्या जागा, प्रवरा, माळूंगी नद्यांचे कोरडे वाळूचे पात्र अशा ठिकाणी दारू पिणारे, गांजा ओढणारे तसेच चरस, अफू सारख्या मादक द्रव्यांचे सेवन करणारे बेवडे, तळीराम लोक रोज अड्डे भरवत होते. त्यामुळे परिसरातील नागरिक, महिला, मुली यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नेहमीच तक्रारी करण्यात येत होत्या.

सदरच्या बाबीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने परवा पासून संगमनेर शहरातील मोकळी मैदाने चेक करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. रविवार दि. 23/7/2023 रोजी देखील सायंकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान नगर शहरातील सर्व मोकळी मैदाने, जागा संगमनेर पोलिसांकडून चेक करण्यात आली. त्यामध्ये जाणता रजा मैदान, स्वदेश मैदान, गोल्डन सिटी, गंगामाई घाट इ. ठिकाणे तपासणी करण्यात आली.

या ठिकाणावर जे जे लोक नशा करताना, दारू पिताना मिळून आले त्या सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 185, कलम 84,  कलम 85 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमा खाली कारवाई करण्यात आली आहे..

सदरची कारवाई संगमनेर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार,पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाणे यांनी व पोलीस स्टेशनच्या स्टाफ ने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!