नगर पोलिसांच्या ‘दिलासा हॉल’ बांधकामाची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी सुरू !
प्रतिनिधी —
अहमदनगर शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील पोलिस अधीक्षक निवासस्थानाजवळ बांधण्यात आलेल्या ‘दिलासा हॉल’ सभागृहाच्या बेकायदा बांधकामाबाबत चौकशीसाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या प्रकरणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी गृह विभागाकडे तक्रार केली होती.

या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रारदार शाकीर शेख यांनी सविस्तर दिलेली माहिती अशी की, सन २०१९ मध्ये पोलिसांच्या दिलासा सेल कार्यालयालगत अनधिकृतपणे व अवैध मार्गाने जमवलेल्या निधीतून हॉलचे (सभागृह) बांधकाम केलेले आहे व त्याची चौकशी होऊन कारवाई करण्यास होतअसलेल्या दिरंगाईबाबतची तक्रार शाकीर शेख यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.

त्याआधी त्यांनी २ मार्च २०२१ रोजी अप्पर मुख्य गृहसचिवांकडेही तक्रार केली होती. गृह विभागा कडून २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीस महासंचालक यांना अहवाल सादर करणे कामी आदेश करण्यात आले होते. पोलीस महासंचालक यांच्याकडून चौकशी न करता नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले होते.

बी. जी. शेखर यांनी पोलीस अधीक्षक यांना अभिप्राय सादर करण्याचा कळवले. मात्र सदरची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याने त्याची चौकशी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती. त्यांनी दिशाभूल करणारी चौकशी केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेख यांनी याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक यांना सदर प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या चौकशी अहवालावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. संबंधित हॉल बांधताना कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली गेली नाही. व बांधकामासाठी सरकारी अनुदानाचाही वापर केला गेला नाही.

तत्कालीन पोलिसअधीक्षक रंजनकुमार शर्मा, तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी हे बेकायदा बांधकाम केले. त्याची नोंद अहमदनगर महानगरपालिकेकडे आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकामविभागाकडेही नसल्याची माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले असल्याचा दावा तक्रारदार शेख यांनी केला होता. तसेच या हॉल बांधकामाची परवानगी व बांधकाम खर्च याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडेही उपलब्ध झाली नाही.

सुमारे ३० ते ३५ लाख रुपये खर्चातून हे बांधकाम झालेले आहे. याबाबत पोलीस महासंचालक यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. शेखर यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केलेली असून तक्रारदार शेख यांना शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात चौकशी व जबाब नोंदण्या कामी हजर राहण्याबाबत कळविले आहे. दिलासा सेल प्रकरणी उच्च न्यायालयात १९ जुलै २०२३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

