शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आमदार थोरात गटाचे वर्चस्व !
महसूल मंत्री विखे पाटील यांच्या गटाला धक्का…
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीच्या दोन जागासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने दोन्ही जागावर मोठ्या मतधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत महसूल मंत्री विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा विखे गटाला आश्वी जिल्हा परिषद गटात मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

राजकीय सत्ता नाट्याची गणिते जुळवत असताना विखे पाटील गटाच्या सदस्याला जात पडताळणीत नुसार पदमुक्त करण्यात आले होते. तर आमदार थोरात गटाचा एक सदस्य मृत झाल्याने प्रभाग २ व प्रभाग ४ अशा दोन जागा रिक्त झाल्या होत्या.

या पोटनिवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मधून विखे पाटील गटाकडून वैष्णवी महेंद्र जगताप विरुद्ध आमदार थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे तसेच प्रभाग क्रमांक ४ मधून सपना प्रदीप मुन्तोडे विरुध्द शेतकरी मंडळाच्या करुणा सागर मुन्तोडे यांच्यात थेट लढत झाली.

यामध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रभाग २ मधून गितांजली संदीप मुन्तोडे (३९६ मते) व प्रभाग ४ मधून करुणा सागर मुन्तोडे (३२९ मते) या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यामुळे ना. विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील जनसेवा मंडळाला पराभवाचा सामना करावा लागल्याने आश्वी जिल्हापरिषद गटात हा मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणूक निकालानतंर ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत आता आमदार थोरात गटाचे संदस्याचे संख्याबळ ५ तर मंत्री विखे गटाचे सहा सदस्य आहेत.
दरम्यान दोन्ही विजयी उमेदवारासह जेष्ठ कार्यकर्त्याचा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यानी यशोधन कार्यालयात सत्कार केला असून याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात तसेच सरपंच प्रमोद बोंद्रे, दिलावर शेख, राजेंद्र चकोर, नंदू वालझाडे आदिसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

