निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ‘गणेश’ चालवायला देणे बेकायदेशीर — आमदार  बाळासाहेब थोरात

 

आमदार बाळासाहेब थोरात यांना घाबरून महसूल मंत्री विखे पाटलांनी सत्तेचा गैरवापर करीत गणेश सहकारी साखर कारखाना पाच वर्षांसाठी चालवण्यास घेतला… सोशल मीडियावर आमदार थोरात समर्थकांचा आरोप

 

प्रतिनिधी —

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष जोरदार रंगला आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घातल्याने घाबरलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करीत एकाच दिवसात नोटीस काढून, एकाच दिवसात बैठक घेऊन गणेश कारखाना पाच वर्षासाठी चालवण्याकरता घेतला आहे.

या बैठकीचे नोटीस सहकार मंत्री, सहकार आयुक्त, गणेश कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांना देण्यात आली असून ही मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करण्यात आली आहे. आणि त्यानंतर लगेचच गणेश साखर कारखाना विखे पाटील साखर कारखान्याला पाच वर्षे चालवण्यासाठी देण्यात आलेला आहे.

संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे कराराने चालवायला देणे हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे.

यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याच्या ताब्यात होता, त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला, त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे. सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाहीत असा घणाघात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

थोरात म्हणाले, ‘श्री गणेश सहकारी साखर कारखाना आसवणी प्रकल्पासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यासंदर्भातील घटनाक्रम अत्यंत संशयास्पद आहे. ३० मे रोजी साखर आयुक्तांकडून बैठकीची सूचना आणि लगेचच त्याच दिवशी बैठक आणि तातडीने गणेश कारखाना भाडेकराराने देण्याचा निर्णय घेणे. कोणाच्या दबावातून हे सर्व केले जात आहे, याची जाणीव जनतेला आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे.

थोरात पुढे म्हणाले की, निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना केलेला हा करार बेकायदेशीर आहे. न्यायालयातही आणि सभासद शेतकऱ्यांच्या दरबारातही तो टिकणार नाही. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी सभासद व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी मी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.

गणेश परिसराच्या विकासाची ही कामधेनु जिवंत राहण्यासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत. त्यांचा हेतू जरी गणेश बंद करणे असा असला तरी गणेशचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि ही संस्था चालवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासद आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा भाडेकरार होतो आहे. सत्तेचा हा गैरवापर सभासद आणि शेतकरी सहन करणार नाही. ‘गणेश’ वाचविण्यासाठी सर्व पातळ्यांवर आम्ही लढणार आहोत असेही थोरात म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!