भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता :— हर्षवर्धन सपकाळ
कॉकरोच पार्टी हा भारतीय जनतेच्या मनातील असंतोष
संगमनेर प्रतिनिधी —
भाजप प्रणित सरकारकडून देशात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारामुळे अराजकता वाढीस लागली असून कॉकरोच पार्टी ही असंतोषाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाला त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सुधाकर जोशी, विश्वास मुर्तडक, रामहरी कातोरे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, निखिल पापडेजा, यांच्यासह विविध नगरसेवक व अमृत उद्योग समूहातील संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेतृत्व आहे. विविध जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळली असून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. एका निवडणुकीवर मूल्यमापन होत नाही. इतिहासामध्ये अनेक थोर पुरुषांच्या जीवनातही आलेख खालीवर झाला आहे. मात्र येणारा टप्पा यानंतर मोठा असतो. नियतीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चांगले आहे. संगमनेरकरांच्या मनामध्ये जे आहे ते माझ्याही मनात त असल्याचे ते म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टी हे भारतीय जनतेमध्ये असलेल्या असंतोषाचे प्रतीक आहे. देवाधर्माच्या नावावरून जातीय ध्रुवीकरण केले जात आहे. देशामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून पेट्रोल, डिझेल बाबत दररोज वाभाडे निघत आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. अर्थव्यवस्थेची मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय बँकांमध्ये खडखडाट झाला आहे. संवाद महत्त्वाचा असून सोशल मीडियामुळे बदललेल्या संवाद ही क्रूर भावना झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना संघर्षाच्या भूमिकेत राहावे लागेल.

तर माजी मंत्री थोरात म्हणाले की, सध्या देशांमध्ये डिझेल पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. खरीप पिकाचा हंगाम सुरू होणार आहे. अशा काळात सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मात्र सरकार काहीही करत नाही. एसआयआर मतदार पुनरनिरीक्षण प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बुथवर बीएलओ 2 ची भूमिका करत मतदार नोंदणी मधून कुणीही अपेक्षित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले तर अजय फटांगरे व सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले यावेळी युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
