अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपविणाऱ्यांना आधी जाब विचारा :
संगमनेरात आलेल्या सपकाळांना आमदार खताळांचे प्रत्युत्तर
संगमनेर | प्रतिनिधी —
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर आरोप करण्यापेक्षा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपविण्यात धन्यता मानणाऱ्यांना जाब विचारावा, असा पलटवार आमदार अमोल खताळ यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या संगमनेर दौऱ्यावर केला आहे.
खरी अराजकता काँग्रेसमध्येच असून पक्षाचे अस्तित्व सर्वत्र संपत चालले आहे. ज्यांना पक्षाने मोठी पदे देऊन मोठे केले, त्यांनीच अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष कसा संपवला? याचे आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ यांनी करावे. नाशिक पदवीधर निवडणूक आणि त्यानंतरच्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडे जाऊन हर्षवर्धन सपकाळ पाहुणचार घेत आहेत. हा निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे, असा टोलाही आमदार खताळ यांनी लगावला.

कांद्याच्या बाजारभावासारख्या विषयांवर सरकारसमोर आव्हाने आहेत. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकार तत्परतेने काम करत आहे. तसेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध होऊन बाजारपेठेतही चलनवाढ होईल. महायुती सरकार शेतकरी हिताची भूमिका घेणारे सरकार असल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याबाबत बोलताना आमदार खताळ म्हणाले की, काही ठिकाणी अफवा आणि साठेबाजीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सरकार सातत्याने काम करत असून विरोधक मात्र अराजकतेचे वातावरण निर्माण करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत.

राजकीय द्वेषातून होणाऱ्या आरोपांकडे लक्ष देत नसून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे आणि विकासकामे राबविणे यावर भर असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले. आगामी काही वर्षांत संगमनेर मतदारसंघात विकासाचा सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
