संकेत नवले : खुनाच्या तपासाचे धागेदोरे थेट अमेरिका – हाँगकाँग पर्यंत !

विशेष प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या आणि संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत असून आता या हत्येच्या तपासाचे धागेदोरे थेट कॅलिफोर्निया, अमेरिका आणि हाँगकाँग पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. आता पोलिसांना यातून काय हाती लागेल ते लवकरच समोर येईल.

दरम्यान याप्रकरणी अटक केलेले आरोपी शाहरुख आणि सलमान या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी मात्र नेमका हा खून कशामुळे झाला हे अद्याप सांगितलेले नाही. खुनाचे कारणच समोर येत नसल्याने पोलिसांचा तपास देखील संशयाच्या जाळ्यात अडकलेला आहे.

हा गुन्हा संपूर्ण तांत्रिक तपासावर अवलंबून आहे. तरीही नेहमीच्या पद्धतीने पोलिसांना खुनाचा तपास लावणे सध्या जिकरीचे काम ठरत आहे. आरोपींनीच खून केला असा पोलिसांनी आरोप केला असला तरी आणि पोलिसांचा तसा ठाम संशय असला तरी आरोपींनी कशासाठी ? कोठे ? कोणत्या हत्याराने खून केला, कोणते वाहन वापरले गेले ? याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगतात.

तसेच मयत संकेत नवलेच्या अंगावर असलेल्या वस्तूंपैकी डोक्यावरील टोपी, डोळ्यावरील चष्मा, पायातील सॉक्स हे पोलिसांना अद्याप मिळून आलेले नाहीत. पोलिसांनी आरोपी शाहरुख शेख याच्या घराची झडती घेतली असली तरी त्यांना मयत संकेत नवले याच्या कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत. मयत नवले याचा मोबाईल देखील पोलिसांना मिळालेला नाही. असे पोलिसांनी म्हटले आहे.

मयत संकेत नवले हा कोणते मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होता आणि आरोपी शाहरुख शेख कोणते मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होता आणि त्या मोबाईल ॲप्लिकेशनचे मयत नवले वापरत असलेल्या ॲप्लिकेशनशी कसे साम्य होते, अशी माहिती पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे यातील दुसरा आरोपी सलमान शेख याला मोबाईल वापरता येत नाही. त्याला मोबाईल वापरता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोबाईल वापरण्याचे ज्ञान त्याला नाही असे पोलिसांचे म्हणने आहे.

एकंदरीत या प्रकरणी पोलीस समलैंगिक संबंधा बाबत दावा करत असले तरी खून नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला आहे. याचा स्पष्ट उल्लेख उल्लेख पोलिसांकडून होताना दिसत नाही.

त्यामुळे मयत संकेत नवले याच्या खुनाचा तपास हाच संशयाच्या भवऱ्यात असल्याचे बोलले जात आहे. तर आरोपीने पोलिसांकडून छळ होत असल्याची तक्रार न्यायालयाकडे केलेली आहे. त्यावरून त्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण…

दरम्यान संकेत नवले याच्या खुनाचा तपास आणि अटक केलेल्या आरोपीं बाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण संपूर्ण शहरात पसरलेले आहे. आरोपींच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, आमच्या मुलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी विनाकारण त्यांना पकडले आहे. तसेच पोलिसांकडूनही याबाबत पाळली जाणारी गुप्तता आणि न्यायालयात मांडलेले मुद्दे या सर्व बाबींचा विचार करता जनतेमध्ये याप्रकरणी उलट सुलट चर्चा सुरू आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!