संगमनेरात मटका – जुगार अड्ड्यांसह अवैध धंदे तेजीत !

घरफोडी, चोऱ्या, वाहन चोरी थांबत नाहीत !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात मटका आणि जुगार अड्ड्यांसह विविध धंद्यांनी जोर धरला असून पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष अवैध धंदा करणाऱ्या मटका किंग आणि जुगार अड्ड्यांच्या मालकांच्या पथ्यावर पडले आहे. शहरात आणि तालुक्यात घरफोड्या, चोऱ्या, वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडतच आहेत. त्याचबरोबरीने शहरातील आणि तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात पोलीस नेहमीप्रमाणे टाळाटाळ करीत आहेत. कारवाईच्या काही थातूरमातूर घटना वगळता पोलिसांची अवैध धंद्यांना बंद करण्याची मानसिकता दिसून येत नाही.

काही दिवसांपूर्वी शहरातील आणि ग्रामीण भागातील सुप्रसिद्ध अशा एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. मात्र कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची चर्चा त्यावेळी होती. अवैध धंद्याच्या संदर्भात वृत्तपत्रातून आणि माध्यमातून बातम्या आल्या की कारवाई करायची. पंटर पकडायचे आणि पुन्हा अवैधंदे कसे सुरु राहतील यासाठी अवैध धंद्यातील गुन्हेगारांना मदत करायची अशी पोलिसांची नेहमीची चाल असते.

संगमनेर शहरासह तालुक्यात आणि ग्रामीण भागात मटका, जुगार अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक, गांजा विक्री, गुटखा तस्करी, गोवंश हत्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ग्रामीण भागातील ढाब्यांवर अवैधरित्या दारू विक्री करण्यात येते. ग्रामीण भागात दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे देखील आढळून आले. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या हद्दीत वेश्या व्यवसायावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धाड मारीत घारगाव पोलिसांचे पितळ उघडे पाडले होते.

त्यानंतर वडगाव पान येथे देखील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले होते. व त्या ठिकाणी देखील पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानेच छापा मारून कारवाई केली होती.

एकंदरीत पाहता संगमनेर शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी बाहेरची पोलीस पथके येतात. परंतु तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांकडून या धंद्यांवर कारवाई होताना दिसत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील काही दिवस ‘कारवाईचा शो’ करतात आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.

गेल्या दोन-तीन महिन्याची गुन्हेगारीची माहिती घेतली असता संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोऱ्या, मोटार सायकल वाहनांची चोरी, शेतकऱ्यांच्या वीज पंपांची चोरी, याचबरोबर महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी असे अनेक गुन्हे घडले आहेत. याचा कुठलाही तपास पोलिसांना लागला नाही. हे सर्व घडत असताना अवैध धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!