घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोडी !
मुंजेवाडी येथील घटना; चोऱ्यांचे सत्र सुरूच
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी येथील समाधान संजय कापसे यांच्या बंद घराची कडी उघडून अज्ञात चोरट्याने कपाटातील मणीमंगळसूत्र चोरून पोबारा केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी येथे समाधान कापसे हे राहात आहेत. त्यांच्यासह आई हे दोघेजण शुक्रवारी सायंकाळी घराला कडी लावून जनावरांना चारा आण्यासाठी शेतात गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सामानांची उचकापाचक करत. मणीमंगळसूत्र चोरून पोबारा केला आहे. कापसे हे चारा घेऊन घरी आले असता त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी समाधान कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६३/ २०२३ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पठारभागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामध्ये शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मोठ्याप्रमाणात चोरी गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

