संकेत नवले खून प्रकरणी शाहरुख आणि सलमानला अटक !
दोघा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी ; तिसरा आरोपी कोण ?
प्रतिनिधी —
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या अकोले येथील मूळ रहिवासी असलेल्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या रहस्यमय खुनाच्या तपासात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला १३ फेब्रुवारी पर्यंत तर दुसऱ्या आरोपीला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली असून संकेत नवले याचा खून करण्याचे कारण मात्र सांगण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.

तर या प्रकरणी पोलिसांचा अजून एका तिसऱ्या आरोपीवर संशय असल्याची चर्चा असून पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. या संदर्भाने बाजारात आलेल्या बातम्यानबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहे.
शाहरुख हसन शेख (वय २२) व सलमान इमाम शेख (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून शाहरुख याला १४ फेब्रुवारी पर्यंत आणि सलमान याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सन २०२२ च्या ८ डिसेंबर रोजी संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह संगमनेरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या बाजूला आढळून आला होता. शवविच्छेदनातून त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. घटनास्थळावर पोलिसांना कोणत्याच वस्तू हाती न लागल्याने तपासात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले.

दरम्यान संकेत नवले यांच्या मारेकऱ्यांना लवकर पकडा या मागणीसाठी अकोल्यात मोर्चा देखील निघला होता. पोलिसांवर सामाजिक दबाव देखील होता. साधारण दोन महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला असून दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात तिसरा आरोपी देखील असल्याची माहिती समजली असून हा आरोपी कोण हे मात्र अद्याप पर्यंत समजलेले नाही.

दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून संकेत नवले याच्या खुनाचे कारण आम्ही सांगू शकत नाही. खून कसा केला, का केला या घटनेची अधिक माहिती देऊ शकत नाही. यासंदर्भात पोलीस कस्टडी दिली एवढी एकच माहिती अधिकृत रित्या देऊ शकतो बाकी अधिकृत माहिती मी देऊ शकत नाही. असे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

