भुरट्या महिला चोरांनी खंडोबा यात्रेत दागिने केले लंपास !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील कऱ्हे येथील खंडोबा देवस्थानच्या गडावर देवदर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेसह तिघींचे सुमारे लाखभर रुपयांचे दागिने दोन अज्ञात महिलांनी लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे.

धारणगाव देवपूर, तालुका सिन्नर येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे राहत असलेल्या वनिता भगवंत घुगे या संगमनेर तालुक्यातील कऱ्हे येथील खंडोबा मंदिराच्या गडावर देवदर्शनासाठी आल्या होत्या.

त्यावेळी तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी वनिता घुगे यांच्या पर्समधील दागिने ठेवलेला पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा बॉक्स लंपास केला.

याशिवाय अन्य दोन महिलांच्य गळ्यातील मनी मंगळसूत्र व सोन्याची पोत त्यांचे नकळत अलगद गळ्यातून काढून चोरून नेल्याचे लक्षात आले. गडावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत या दोन्ही चोरट्या महिला तेथून काही वेळातच गायब झाल्या. महिलांनीच महिलांच्या दागिन्यांचे चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीनही महिलांचे ९५ हजार रुपयांचे दागिने या दोन महिलांनी लंपास केले.

या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वनिता भगवंत घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घुगे यांच्यासह आणखी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात दोन महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.

