वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षांवर कारवाई ; खबऱ्या पळाला 

प्रतिनिधी —

 

संगमनेर शहरातील मंगेश सुरेश घुले या वाळूतस्कराला एक वर्षासाठी प्रांताधिकारी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी काढले आहे. यापूर्वी प्रांताधिकार्‍यांनी दोघा तस्करांचे हद्दपारीचे आदेश काढले होते, त्यात आणखी एकाची भर पडली आहे.

मंगेश घुले यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या घुले याच्या विरोधात शहर पोलिसांमार्फत हद्दपारचा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीसाठी प्रांताधिकार्‍यांनी पोलीस उपाधीक्षकांना आदेश दिले होते.

पोलीस उपाधीक्षकांनी आपला चौकशी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करत घुले याला दोन वर्षासाठी नगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.

घुले याच्यावर कारवाई करणे उचित असल्याची खात्री पटल्याने प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी घुले याला एक वर्षाच्या कालावधीसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. प्रांत अधिकाऱ्यांचा हा आदेश तातडीने शुक्रवारपासून अमलात आणण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

दरम्यान महसूल विभागाने वाळू तस्करांवरील कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केली असून गुरुवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पोमल तोरणे, सांगळे मॅडम यांनी गंगामाई घाट, कासारा दुमाला येथून वाळू चोरी करणाऱ्या रिक्षा पकडल्या आहेत.

 

खबऱ्या पळाला….

मोटार सायकलद्वारे पाठलाग करून व पाळत ठेवून वाळू तस्करांना महसूल अधिकाऱ्यांच्या हालचाली बाबत माहिती पुरविणाऱ्या खबऱ्याला सुद्धा पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो मोटार सायकल टाकून पळून गेला. त्याची मोटारसायकल ताब्यात घेण्यात महसूल विभागाला यश आले. दरम्यान हा खबऱ्या कोण ? याचा शोध महसूल खात्याने सुरू केला आहे. 

 

गेल्या काही दिवसापासून महसूल खात्याने मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करणाऱ्या रिक्षा पकडल्या असून या रिक्षा स्क्रॅप केल्या जाणार असल्याची माहिती, तसेच रिक्षा द्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे वाळू साठे नष्ट करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!