अकोले – राजूर येथून दोन अल्पवयीन मुली गायब !
प्रतिनिधी —
अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहरात एका कापड दुकानातून सायंकाळच्या वेळी एक अल्पवयीन मुलगी गायब होण्याची घटना घडली. तर दुसरीकडे राजुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हरीपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. दोन मुली दोन दिवसात गायब झाल्याची घटना घडल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.

राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावामधील एक मुलगी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त हरिपाठ करण्यासाठी गेली होती.

हरिपाठ संपल्यानंतर मंदिरातील सर्व लोक घरी पोहोचले. परंतु सदर मुलगी घरी आली नाही. घरच्यांनी तिचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यामुळे सदर मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची शंका तिच्या घरच्यांना आली.

त्यामुळे मुलीच्या आजीने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला (वय १७ वर्षे ८ महिने) पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे अकोले शहरातील एका कापड दुकानात कामास असलेल्या मुलीला तिच्या घरच्यांनी सकाळी दुकानात सोडले. मुलगी रात्र झाली तरी घरी आली नाही. म्हणून संबंधित घरच्या मंडळीनी सदर कापड दुकानात चौकशी केली. त्यावेळेस कापड दुकान मालक यांनी सांगितले की, सदर मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर गेली आहे.

नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु मुलगी आढळून आलेले नाही. त्यामुळे सदर मुलीला कोणीतरी पळून नेले असावे असा तिच्या नातेवाईकांचा संशय आहे. या संदर्भात मुलीच्या आईने माझी अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे १ दिवस) हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे अशी फिर्याद दिली आहे. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.

