संगमनेरात घरफोड्यांचे सत्र सुरूच !
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यात दरोडे, चोरी घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील धांदरफळ येथे घरफोडी झाली असून दोन तोळे सोन्यासह ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

धांदरफळ बुद्रुक येथे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी अफसर बालम तांबोळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि कपाटातील सोन्याचे गंठण व शोकेसमध्ये ठेवलेल्या पैशाच्या डब्यातील रोख रक्कम असे दोन डोळे सोने व एकूण ५२ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

अफसर तांबोळी यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक डी.बी. घोडे हे पुढील तपास करत आहेत.
संगमनेर तालुक्यात शहरासह विविध भागात घरफोड्या, चोऱ्या, मोटरसायकल चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत. ग्रामीण भागात दररोज अशा घटना घडत आहेत. नुकतेच निमोण येथील सरपंचांच्या घरी देखील १४ लाख रुपयांची चोरी झाली होती. एकंदरीत पाहता ग्रामीण भागातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने चोरट्यांना पकडण्यात पोलीस मात्र अपयशी ठरु लागले आहेत.

