अकोले राजुर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांवर छापे..
श्रीरामपूरच्या भरारी पथकाची कारवाई
अकोले, राजुर, भंडारदरा परिसरात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू आहे. तालुक्यात राजूर येथे दारूबंदी असतानाही दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच अवैध आणि बनावट दारूची विक्री सुद्धा या परिसरात होत असते. आता नवीन वर्ष पुढील चार-पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. भंडारदरा परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. अशावेळी ‘थर्टी फर्स्ट’ च्या निमित्ताने अवैध दारूचा या भागात सुळसुळाट होणार आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग, राजुर पोलीस आणि संगमनेर उपविभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी —
राजूर, संगमनेर, अकोले तालुक्यातील उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या नाकावर टिचून श्रीरामपूर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने अकोले तालुक्यातील राजुर आणि इंदोरी या ठिकाणी छापे घालत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाताळ ते ३१ डिसेंबर च्या दरम्यान या कारवाईला महत्त्व आले आहे.

उत्पादन शुल्कला गुप्त माहितीगारा कडून राजुर आणि इंदोरी फाटा या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.
सदर ठिकाणी छापे टाकून पथकाने आनंदा अंकुश देशमुख, विक्रम अशोक घाटकर, दीपक बाळू पालोदे, अमोल सूर्यकांत कानकाटे, संजय अदालतनाथ शुक्ला, नवनाथ सुरेश देशमुख, सचिन सुदाम, भाऊसाहेब बालाजी शिंदे या आठ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमध्ये केळुंगण शिवारातील हॉटेल हिरा राजुर व हॉटेल सह्याद्री इंदोरी फाटा यांचा समावेश आहे. हॉटेल सह्याद्रीचे मालक दशरथ अप्पा नवले यांना फरार घोषित करण्यात आलेले आहे. यावेळी एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाळ चांदेकर व एस बी शिंदे यांच्या भरारी पथकाने केली असून या कारवाईत के.के. शेख, टी. आर. शेख, एस.आर. फटांगरे यांनी सहभाग घेतला.

