संगमनेर शहर व तालुक्यात दरोडेखोरी, घरफोड्या, चोऱ्यांचा धुमाकूळ !

चार पोलीस स्टेशन आणि एक उप अधीक्षक कार्यालय असूनही दरोडेखोरांची व चोरट्यांची दहशत !

संगमनेर तालुक्यात चार पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय असून देखील चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून यांचा तपास लागत नाही. मोटार सायकलींची चोरी तर रतीब घातल्याप्रमाणे दररोज सुरू आहे. पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई, शोध आणि तपास नसल्यामुळे पोलिसांविषयी प्रचंड नाराजी आहे.

 

प्रतिनिधी —

 

खून, दरोडेखोरी, घरफोड्या आणि चोऱ्या संगमनेरमध्ये नित्याची बाब बनले आहेत. सातत्याने होणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेर शहरातील नागरिक धास्तावलेले आहेत.

तसेच ग्रामीण भागातही घरफोड्या आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. शहर व आजूबाजूच्या उपनगरातील आणि गावातील नागरिक, तरुण रात्र रात्रभर जागून आपापल्या भागात संरक्षण करण्याचे काम करत आहेत. ग्रामीण भागातील संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव या पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील चोऱ्या आणि घोरपडे यांचे प्रमाण वाढले आहे.

विशेष म्हणजे तालुक्यात चार पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय असून देखील चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून यांचा तपास लागत नाही. पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई, शोध आणि तपास नसल्यामुळे पोलिसांविषयी प्रचंड नाराजी आहे.

 

सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडीमधील खाबीया अ‍ॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात एकाचवेळी काही घरांमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला. एका बंद घरातून सुमारे पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचे समोर आले आहे. मोटर सायकल चोरी तर रोज रोज रतीब घातल्याप्रमाणे सुरू आहे.

 

शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे चोरटे, दरोडेखोर स्थानिक पोलीस यंत्रणेला दररोज नवनवे आव्हान देताना दिसतात. शहराच्या काही भागात नागरिकांना चोर, दरोडेखोरांचे दर्शन देखील झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रभारी पोलिस राज संपवून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी खमके अधिकारी देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

सुकेवाडी शिवार, घुलेवाडी, राहणे मळा, भाऊसाहेब थोरात व्यापारी संकुल अशा विविध ठिकाणी सातत्याने सलग घरफोड्या झाल्या आहेत. दरोडे झाले आहेत. तरीही पोलिसांना एकही आरोपी या घटनांमध्ये सापडलेला नाही. पोलिसांचे शोध पथक नेमके कुठे फिरते हे समजण्यास मार्ग नाही.

 

शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील खाबीया अ‍ॅब्रोसिया या इमारतीत रविवारी पहाटेच्या वेळी साडेचार वाजता घरफोडीची घटना घडली आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत देवा मोहन भगत यांच्या बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत घरातील वस्तूंची उचकापाचक केली. तसेच कपाटातून पंचावन्न हजार रुपयांचे रोकड आणि दहा हजार रुपयांचे दागिने लंपास केले. यासंदर्भात सोमवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दुसऱ्या घटनेत न्यायालयातील अधिकाऱ्याचेच पाकीट मारले संगमनेरमध्ये चोरांनी उच्छाद मांडला आहे. मूळचे नगरचे असलेले नोकरी निमित्ताने सध्या संगमनेरच्या घुलेवाडीतील रहिवासी व दिवाणी न्यायालयात सहाय्यक अधीक्षक असलेले खान महमूद बिबन हे सोमवारी पारनेर-नाशिक बसने प्रवास करत संगमनेरमध्ये आले. बस मधून ते खाली उतरत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट चाव्या आणि काही कागदपत्रे लांबविली. पाकिटामध्ये तेरा हजार दोनशे रुपयांची रोकड होती. सातत्याने आणि दररोज सुरू असलेल्या चोऱ्या रोखण्यात शहर पोलीस अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे संगमनेरच्या बस स्थानकात दोनच दिवसापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या उपस्थितीत पोलीस चौकीचा शुभारंभ झाला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!