तीन बायका अन् चौथीसोबत प्रेमप्रकरण !
सॅंडलमुळे आरोपी अटकेत
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
एका मयत तरुणीच्या ब्रँडेड सॅंडलच्या मदतीने पोलिसांनी गुंतागुंतीचं खुन प्रकरण उघडकीस आणले असून दोन आरोपींना अटक केली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी गुंतागुंतीचं खून प्रकरण उघडकीस आणलं आहे. १४ डिसेंबर रोजी धामणी गावाजवळील गढी नदीत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृत तरुणीच्या ब्रॅंडेड सॅंडलच्या मदतीने मृत तरुणीची ओळख पटवत मारेकऱ्याला जेरबंद केलं आहे. सुरुवातीला पनवेल पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. तरुणीचा गळा दाबून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पोलिसांनी ब्रॅंडेड सॅंडलच्या मदतीने मृत तरुणीची ओळख पटवली. त्यानंतर दोन आरोपींना अटक केली आहे.

उर्वशी वैष्णव असं २७ वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. तर रियाझ खान असं मुख्य आरोपीचं नाव आहे. आरोपी रियाझ खान हा जीम ट्रेनर आहे. तर मृत तरुणी एका बारमध्ये काम करते. आरोपी रियाझला तीन बायका आहेत. तरीही तो मृत उर्वशी वैष्णवसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता.

नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितलं की, “आम्ही मुख्य आरोपी, देवनारचा जिम ट्रेनर रियाझ खान आणि कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा त्याचा साथीदार इम्रान शेख याला अटक केली आहे. तसेच आम्ही मृतदेहाजवळ सापडलेल्या ब्रँडेड सँडलच्या मदतीने पीडितेची ओळख पटवण्यात आणि आरोपीचा शोध घेण्यात यशस्वी झालो.”

हत्येचं गूढ कसं उलगडलं?
मृत तरुणीच्या पायात सँडल घातला होता, ज्यावर संबंधित दुकानाचे नाव होते. दुकानाच्या नावावरून पोलिसांनी संबंधित दुकानाच्या सर्व शाखांना भेट दिली. मृत तरुणीचा फोटो दाखवून तपास केला. त्यासाठी दुकानातील आठ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, वाशी येथील चप्पल विक्रेत्याने मृत तरुणीला ओळखले. संबंधित तरुणी ६ डिसेंबर रोजी आपल्या दुकानात आली होती, अशी माहिती चप्पल विक्रेत्याने पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत तरुणीची ओळख पटली. ती एका बॉडी बिल्डर व्यक्तीसोबत दुकानात आली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी रियाझ याची तीन लग्न झाली होती. तरीही तो मृत उर्वशीसोबत प्रेमसंबंधात होता. आरोपीनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. उर्वशीने लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपी रियाझने साथीदार इम्रान शेखच्या (२८) मदतीने उर्वशीची गळा दाबून हत्या केली. १३ डिसेंबर रोजी रात्री आरोपींनी उर्वशी वैष्णवचा मृतदेह धमणी गावाजवळील गढी नदीत फेकला. सौजन्य दैनिक लोकसत्ता

