गणपतीला हार व प्रसाद द्यायचा सांगून पावणेदोन तोळे सोने लांबविले !
संगमनेर शहरातील घटना…
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरी घरफोडी दरोड्याच्या घटना सुरू असतानाच आता देवाचे नाव पुढे करीत हातचालाखी दाखवत दिवसा ढवळ्या एका महिलेची फसवणूक करीत सोने चोरून नेण्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दोन महिन्यापुर्वी १५ ग्रॅम वजनाची चैन व २ ग्रॅम वजनाचे पेंडल खरेदी केले होते व ते मी रोज वापरत होते.

सोमवारी दुपारच्या सुमारास मी माझ्या पान टपरीच्या दुकानावर असताना एक इसम टपरीसमोर आला व म्हणाली की, मावशी मला गायछाप द्या. मी त्याला गायछाप पुडी दिली असता तो मला म्हणाला की, येथे गणपती मंदिर कोठे आहे. तेथे जाऊन माझ्याजवळ असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमधील हार व प्रसाद मला मंदिरातील पुजारी यांना दान करायचा आहे.

गणपती मंदिर विज वितरण कंपनी जवळ आहे असे मी सांगितले. सदर इसमाने त्याच्या खिशातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून मी सोने चांदिचे दुकान टाकले आहे. मला मंदिरात पाचशे रुपयांचे दान करायचे आहे असे सांगितले.

दान करायच्या पैशांना सोने लावून दान करायचे आहे. त्यावेळी मी माझ्या गळ्यातील सोन्याची चैन त्याच्या हातात दिली. त्यावर त्याने त्याच्याकडील शंभर रुपयांच्या एका नोटेत माझी चैन गुंडाळली व चारशे रुपये असे त्याच्याकडील असणाऱ्या फुलांच्या पिशवीत टाकून पिशवीला गाठ मारुन माझेकडे दिली.

पिशवी तुमच्या दुकानातील देवापुढे अर्धातास ठेवा व नंतर मंदिरात देऊन टाका असे म्हणाला. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली व दुकानातील फोटोपुढे ठेवली. तेवढ्यात सदर इसम हा निघून गेला. त्यानंतर मी थोड्या वेळाने देवापुढे ठेवलेली पिशवी उघडून पाहिली असता पिशवीमध्ये पिशवी मध्ये शंभर रुपयांच्या चार नोटा व झेंडूच्या फुलांची माळ व दोन बिस्कीटचे पुडे दिसले. परंतु माझी सोन्याची चैन ज्या शंभर रुपयांच्या नोटेत गुंडाळली होती ती दिसली नाही.

म्हणून मी पूर्ण पिशवी पालथी करुन पाहिली असता त्यात माझी चैन दिसून आली नाही. त्यामुळे माझी खात्री झाली की, अनोळखी इसमाने मला बोलण्यात गुंतवून ठेवून, हातचलाखी करुन माझी सोन्याची चैन फसवणूक करुन नेली आहे. माझी चैन गेल्याचे लक्षात आल्याने मी माझा मुलगा, सुन व दुकानाजवळ असणाऱ्या लोकांना सांगितले. सदर अनोळखी इसमाचा शोध घेतला तो मिळून आला नाही. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

