संगमनेरात आजी – माजी महसूल मंत्र्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी !

तब्बल ३० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी जल्लोष सुरू असताना आजी माजी महसूल मंत्र्यांच्या दोन गटांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली. या घटनेमध्ये दोन्ही कडची मंडळी जखमी झाली. पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचे जनसेवा मंडळ आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा ‘धुरळा’ उडाला आहे. दोन्ही मंडळाकडून एकमेकांच्या विरोधात फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जनसेवा मंडळाचे सचिन संपत खेमनर (रा.शिकारे वस्ती, अंभोरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभम भास्कर जर्‍हाड याने मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ प्रकाश गणपत खेमनर याला शेतकरी विकास मंडळाकडून उमेदवारी करणार्‍या दगडू बिरु खेमनर यांचा पराभव झाल्याचा राग मनात धरुन धक्काबुक्की करत तोंडावर मारले. आणि त्याच्यासोबत असलेल्या बाळासाहेब दगडू खेमनर यांनी फिर्यादीच्या घरी जावून मारून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

त्याचवेळी नारायण सहादु खेमनर, रंगनाथ सहादु खेमनर, हरिभाऊ सहादु खेमनर, सहादु दामु खेमनर, राधा दामु खेमनर, शरद राघु खेमनर, भरत राघु खेमनर, भास्कर गोविंद जर्‍हाड, कोंडाजी हनुमंत वाघमोडे, नारायण कोंडाजी वाघमोडे व बाळासाहेब दगडू खेमनर यांनी घरासमोर जावून गैरकायद्याची मंडळी गोळा केली व चुलत भाऊ, चुलते यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी, काठीने व हातात दगड घेवून वाहनाच्या कचेनला असलेल्या कटरने मारुन दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी वरील वरील सर्व जणांच्या विरोधात दंगलीचा हाणामारीचा धमकीचा व प्राणघातकशास्त्रांचा वापर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद शेतकरी विकास मंडळाच्या कोमल शरद खेमनर यांनी दाखल केली आहे. फिर्यादीने म्हटले आहे की, माझा भाया नारायण खेमनर यांचा ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ते गावातील मारुती मंदिराच्या समोर उभे होते. त्यावेळी श्रावण गोविंद खेमनर व प्रकाश गणपत खेमनर हे दोघे तेथे आले व त्यांनी नारायण खेमनर यांना दमदाटी करीत त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर फिर्यादी या आपली जाव व सासर्‍यासोबत मोटार सायकलवरुन जनावरांना चारा आणण्यासाठी जात असतांना आरोपी संपत गोविंद खेमनर, सचिन संपत खेमनर, अक्षय श्रावण खेमनर, अशोक गोविंद खेमनर, गणपत गोविंद खेमनर, अजय अशोक खेमनर, योगेश संपत खेमनर, अभय श्रावण खेमनर, ज्योतिबा नामदेव जगन्नर, पंढरीनाथ गंगाराम वाघमोडे, नारायण गंगाराम वाघमोडे, मंगल संपत खेमनर, गोविंद सखाराम खेमनर, सविता अशोक खेमनर, दीपाली प्रकाश खेमनर व अनुराधा सचिन खेमनर यांनी फिर्यादीला व त्यांचे पती शरद खेमनर, भाया नारायण खेमनर, चुलत सासरे सहादु दामु खेमनर व सासरे राधु दामु खेमनर यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या गदारोळात कोमल खेमनर यांच्या उजव्या कानातले झुबे व सोन्याचे गंठणही गहाळ झाले.

या फिर्यादीनुसार वरील सर्वांवर पोलिसांनी वरील प्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही गटाच्या आरोपींवर सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही गटाच्या एकूण ३० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!