संगमनेरच्या लोकपंचायतला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
भारत सरकारच्या विद्युत मंत्रालय आणि उर्जा दक्षता आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सन २०२२ चा राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्था, कुरकुंडी, ता. संगमनेर यांना मिळाला आहे.

१४ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिनाचे औचित्य साधून भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रोपदी मुर्म व केंद्रिय उर्जामंत्री आर. के. सिंघ, केंद्रीय राज्यमंत्री श्री किशन पाल, उर्जा विभागाचे सचिव माननीय आलोक कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात यांचे वतीने कार्यकारी विश्वस्त सारंगधर पांडे, प्राचार्य प्रशांत सहाणे व नोडल ऑफिसर बाळू हासे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कॉलेज व युनिव्हर्सिटी या विभागातून या पुरस्काराची निवड झाली आहे.

भारतामध्ये जवळपास १४,९५६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत असेच अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रामिण व आदिवासी भागातील एका छोटया संस्थेस तिच्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही आमच्य दृष्टीने खूप आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात यांनी व्यक्त केली.

लोकपंचायत संस्थेने सन २०१७ पासूनच २० किलो वॅटचे सोलार एनर्जी प्लांट इन्स्टॉल केले आहे, त्या माध्यमातून दरवर्षी २०,२२१.०४ kWh युनिट चे उत्पादन मिळते. सोलर युनिट ऑन ग्रीड असल्यामुळे जास्तीची तयार झालेली वीज महापारेषणला दिली जाते. याद्वारे दरवर्षी १४,१५४.७० kg कार्बन उत्सर्जन याद्वारे कमी होते.

लोकपंचायत संस्थेच्या परिसरामध्ये १२०० झाडांचे संवर्धन केलेले आहे. त्याच प्रमाणे हाय-वे जवळ ३०० बांबूची रोपे लावली आहेत. जागतिक तापमान वाढ, वातावरणातील विपरीत बदल, प्रदूषण, जैवविविधता, गर्भाशयातील बालके, नवजात बालके, वयस्कर व्यक्ती या सर्व घटकांवरती कार्बन उत्सर्जनाचा विपरीत परिणाम होत असतो.

दमा, श्वसनाचे विकार, कर्करोग व इतरही आजार कार्बन उत्सर्जनामुळे व हवेच्या प्रदूषणामुळे होत असतात हे सर्व टाळण्यासाठी अपारंपारिक उर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे शासनाचे तसेच पर्यावरण तज्ञांचे आवाहन असते. त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न आहेत.

संस्थेने सोलर एनर्जी युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट, बोरवेलचे जल पुनर्भरण, वस्तीगृहासाठी सोलर वॉटरहीटर, फाईव्ह स्टार रेटिंगची विद्युत उपकरणे व मशीनरी यांचा वापर करणे, ड्युअल बटन असलेल्या टॉयलेट फ्लश टॅकचा वापर करणे, संस्थेमध्ये किमान कागद वापर करणे इत्यादी तांत्रिक बाबींचा व उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करून ऊर्जेचे संरक्षण व संवर्धन केले आहे.

लोकपंचायतने अकलापूर या गावात मिशन अर्थिंग अभियानांतर्गत अर्थिंगयुक्त गाव उपक्रम राबवला आहे. विजेच्या अपघातामुळे बऱ्याच वेळा जीवित आणि वित्तहानी होत असते. आजही ग्रामीण भागातील 90 ते 95 टक्के घरांना अर्थिंग नाही, घरामध्ये इस्त्री, फॅन, मिक्सर, पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, संगणक व फ्रिज इत्यादी साधनांचा सर्रास वापर केला जातो या सर्व साधनांना अर्थिंग असणे गरजेचे असते. अर्थिंग नसल्यामुळे साधनांची कार्यक्षमताही कमी होते.

विजेचा शॉक बसल्यास जीविताला धोकाही होतो. पावसाळ्यामध्ये घरांवर विजापडल्यामुळे विद्युत उपकरणे जळतात किंवा नादुरुस्त होतात, हे सर्व टाळण्यासाठी घरोघरी अर्थिंग असणे गरजेचे आहे. लोकपंचायत संस्था त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय पातळीवर या सर्व गोष्टींची दखल घेतल्याचे समाधान मिळाले अशी संस्थे च्याविश्वस्त मंडळाची प्रतिक्रया आहे.

भविष्यामध्ये संस्था आणखी पाच किलो वॅटच्या सोलर प्रोजेक्ट वाढवणार आहे, त्याचप्रमाणे दोन किलो वॅटच्या विंडमिलद्वारे वीज निर्माण करणार आहे. प्राचार्य प्रशांत सहाणे, नोडल अधिकारी बाळू हासे आणि सर्व टीमचे लोकपंचायत विश्वस्त मंडळ, तेरे देस होम्स, जर्मनी, फोक्सवॅगन एम्प्लॉईज फाऊंडेशन आणि संगमनेर तालुक्यातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थानी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

