संगमनेरात एकाच वेळी चार ठिकाणी दरोडा !
सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ५ लाख रुपयांचा ऐवज लुटला !
प्रतिनिधी —
शस्त्रांचा धाक दाखवत एकाच वेळी संगमनेर तालुक्यात चार ठिकाणी दरोडा घालत लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. दरोडेखोरांच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना आज पहाटे सुकेवाडी शिवारात घडली आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने शास्त्रास्त्रांचा धाक दाखवत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी शिवारात व पावबाकी येथील घरांवर चार ठिकाणी दरोडा टाकून सुमारे १लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाइल रकमेसह सुमारे १६ तोळे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.

आजूबाजूच्या घरांना व दरोडा टाकलेल्या बंगल्याच्या वरच्या मजल्याला बाहेरून कड्या लावून या दरोडेखोरांनी घरातील वृध्द पतीपत्नीच्या गळ्याला चाकू लावून घरातील सव्वा लाख रुपये रोख रकमेसह सुमारे ९ तोळ्यांचे दागिने लुटून नेले.
याच परिसरातील आणखी एका घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागीणे व कपाटातील रोख रक्कम लुटली.

तर या अगोदर पावबाकी परिसरात एका घरात घुसून घरमालकाला मारहाण करुन दागिण्यांची लुटमार केली. आणखी एका ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. एकाच रात्री चार ठिकाणी या चोरट्यांनी धाडसी सशस्त्र दरोडे टाकत धुमाकूळ घातला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची संख्या सहा असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे.

घुलेवाडी – सुकेवाडी रोडवर सुकेवाडी हद्दीत उपसरपंच सुभाष कुटे यांची वस्ती आहे. याच वस्तीवर त्यांचे बंधू उत्तम सखाराम कुटे हे आपल्या परिवारासह राहतात. दोन मजली घरात वरच्या मजल्यावर ते आपल्या कुटुंबासह झोपतात तर खालच्या मजल्यावर आई वडील झोपतात. दरम्यान रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटूंब झोपले असता आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात सहा दरोडेखोरांची टोळी या वस्तीवर चाल करुन आली.

त्यांनी एकामागून एक आजूबाजूच्या सर्व घरांना बाहेरुन कडी लावली. तर उत्तम कुटे यांच्या बंगल्याला वरच्या मजल्यालाही बाहेरुन कडी लाऊन घेतली. त्यानंतर हातात लोखंडी टामी, कोयता, चाकू, दंडूके घेऊन त्यांनी खालच्या मजल्यावरील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी घरात घुसून या वृध्द जोडप्याच्या मानेला सुरी लावत आरडाओरड केला तर येथेच जीवे कापून टाकू अशी धमकी दिली. या धमकीला घाबरुन या कुटूंबाने तुम्हाला काय न्यायचे ते न्या पण मारु नका अशी विनंती केल्यानंतर या चोरट्यांनी घरात झाडाझडती सुरु केली.

कपाटासह घरातील सामानाची उचकापाचक करत सव्वा लाख रुपये रोख रक्कम यासह सहा तोळ्याचे दागीणे लुटून नेले. या चोरट्यांनी तब्बल अर्धातास या घरात लुटमार केली.
आजूबाजूच्या घरातील काही लोकांना या प्रकारामुळे जाग आली. मात्र घराला बाहेरुन कड्या लावलेल्या असल्याने कोणीही मदतीला येऊ शकले नाही. त्यानंतर या चोरट्यांनी

शेजारीच लष्कराच्या सेवेत असणाऱ्या नितीन दत्तात्रय दातीर यांच्या घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे दागणी व कपाटात ठेवले बारा-तेरा हजार रुपये लुटून नेले.
या गोंधळात उपसरपंच सुभाष कुटे यांनी खिडकीतूनच चोर-चोर असा आवाज दिला मात्र या चोरट्यांनी त्यांनाही दम दिला. हे चोरटे तेथून पसार झाल्यानंतर कुटे यांनी फोन करुन एकमेकांना मदतीसाठी बोलविले. त्यानंतर पोलीसांनाही घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान हे सर्व घडण्याच्या अगोदरच येथूनच अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या पावबाकी परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास सुनील नाईकवाडी यांच्या घरावरही दरोडा टाकला. यावेळीही हीच पध्दत अवलंबण्यात आली. नाईकवाडी यांना मारहाण करत त्यांच्या घरातूनही दागीणे व रोख रकमेची लूट करण्यात आली.

तसेच येथील सुनील रामनाथ सातपुते यांच्या घरावरही दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी सातपुते कामावरुन घरी परत आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व त्यांनी कुटे यांच्या वस्तीकडे आपला मोर्चा वळवला.
एकाचवेळी चार ठिकाणी घडलेल्या या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलीसांच्या पथकाने श्वानपथकाच्या आधारे तपास सुरु केला आहे. सुनील नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

