वाळू तस्करीसाठी आता गाढवांचा वापर !
मारुती व्हॅन, बैलगाडी आणि स्क्रॅप रिक्षांचाही होतो वापर
प्रतिनिधी —
महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगर जिल्ह्यातील वाळू चोरीला आळा बसला आहे. मोठमोठ्या वाहनातून होणारी वाळू तस्करी बंद असली तरी गाढवावरून होणाऱ्या वाळू तस्करीला मात्र आळा बसलेला नाही. आता गाढवावरून वाळू वाहतूक सुरू असून या वाळूपासून आता बांधकाम व्यवसायिक आपले काम भागवत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

त्याचबरोबर मारुती ओमनी, मारुती व्हॅन सारख्या जुन्या गाड्या बैलगाडी आणि स्क्रॅप रिक्षाचा वापर देखील वाळू चोरी करण्यासाठी होत असल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून वाळू तस्करीवर आळा बसवण्यात महसूल विभागाला यश आले आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांनी घेतलेली कडक भूमिका आणि वाळू तस्करांवर होत असलेले कारवाई यामुळे ट्रॅक्टर, जीप, ट्रक, हायवा सारख्या वाहनातून होणारी वाळू तस्करी थांबली आहे.

तरी वाळूचा वापर आवश्यक असल्याने बांधकाम व्यवसायिक आता इतर वाहनांच्या मार्गाने वाळू मिळवत आहेत. यामध्ये आता जुन्या मारुती व्हॅन, रिक्षा तसेच गाढवांचाही वापर होऊ लागला आहे. गाढवांचा वापर करून वाळू तस्करी करण्याचे प्रमाण जरी मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

संगमनेर शहरात पूर्वीपासूनच गाढवांच्या माध्यमातून वाळू तस्करी होते. यापूर्वी बैलगाड्यांचा देखील वाळू तस्करीसाठी वापर केला जात होता. असे कोणतेही वाहन नाही की वाळू तस्करीसाठी वापरले गेले नाही. ज्या ज्या वाहनातून वाळू तस्करी करता येईल त्या त्या वाहनातून वाळू तस्करी करण्याचा नेहमीच वाळू तस्करांनी प्रयत्न केला आहे.

गाढवाच्या माध्यमातून वाळू तस्करी संगमनेरमध्ये नेहमीच करण्यात येते. आता मोठ्या वाहनातील वाळू तस्करीला आळा बसला असला तरी गाढवावरून वाळू तस्करी करण्याचे काम सुरूच आहे. वाळू टंचाई मुळे वाळूला आता मोठा भाव मिळत आहे. वाळूचे दर देखील वाढले आहेत. बांधकाम व्यवसायिक या छोट्या मोठ्या वाहनातून आणि गाढवांच्या माध्यमातून वाळू मिळवून आपले बांधकाम व्यवसाय चालवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

