पाळीव कुत्र्याला कोयत्याने मारले ; मालकालाही धमकी !

पुतण्याची चुलत्याला धमकी

प्रतिनिधी —

साखळीने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या पाळीव कुत्र्यास एका इसमाने कोयता आणि दगडाने मारून गंभीर जखमी केले आहे व कुत्र्यास का मारले म्हणून विचारणा करणाऱ्या मालकाला देखील ‘तुला सुद्धा कोयत्याने ठार करील’ अशी धमकी दिली असल्याची घटना राहता तालुक्यातील मापारवाडी येथे घडली आहे. लोणी पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

बाबासाहेब लक्ष्मण ढोबळे (लोणी खुर्द, मापारवाडी, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक दत्तात्रय ढोबळे यांच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीत ढोबळे यांनी म्हटले की, मी मापरवाडी, लोणी खुर्द येथील वस्तीवर कुटुंबासह राहतो. आमची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेर आहेत. त्यामुळे येथे आम्ही एक गावरान कुत्रा पाळला आहे. आम्ही टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथे नातेवाईकाच्या वर्षश्राद्ध साठी गेलो होतो. घरी कोणी नसल्याने घरचा पाळलेला गावरान कुत्रा आम्ही कोणाला चावू नये, म्हणून साखळीने बांधून ठेवला होता.

आम्ही टाकळीभान येथे असताना माझा पुतण्या दीपक दत्तात्रय ढोबळे यांनी फोन करून तुझ्या कुत्र्याचे कामच केले आहे. त्याला मी कोयत्याने तोडले आहे, असे फोनवर सांगितले. त्यावर मी म्हणालो ‘तू तिकडे कशाला गेला होता’ तुझे तिकडे जाण्याचे काय काम’ असे म्हटल्याचा राग येऊन त्याने मला सुद्धा ‘तू घरी ये कोयता घासून ठेवला आहे. तुझे कामच करतो. अशी फोनवरून धमकी दिली. त्यानंतर मी घरी आलो असता माझ्या गावरान कुत्रा हा त्याच्या बांधलेल्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर पाठीवर कोयत्याने वार केले असून त्याचा उजवा पाय मोडलेला आहे.

बाबासाहेब लक्ष्मण ढोबळे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात दीपक दत्तात्रय ढोबळे यांच्याविरुद्ध गुरनं ६०९/२२ प्रमाणे भादवि कलम ४२८/४२९/५०७ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हा लोणी पोलीस करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!