अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी महिलेसह एकाला १० वर्षे सक्त मजुरी !
प्रतिनिधी —
अल्पवयीन मुलीला हिंगोली जिल्ह्यातून पळून आणून तिला खोलीमध्ये डांबून ठेवून मारहाण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या महिलेसह एका आरोपींना न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
निलेश सुनिल उमाप (वय – ३४ वर्षे, ), माया रमेश आगलावे (वय ४० वर्षे) (दोघे मुळ रा. इंदिरा नगर कळमनुरी जि. हिंगोली, हल्ली रा. शिवाजीनगर, निंबळक ता.जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

हिंगोली येथून पिडीत अल्पवनीय मुलीस पळून आणून तिला खोली मध्ये डांबुन ठेवून पिडीत मुलीवर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील माधुरी एच. मोरे अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३६३ नुसार २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १,००० / – रुपये दंड , दंड न भरल्यास १ महिना साधी कैद , ३४२ नुसार १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ५०० / – रूपये दंड , दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद , ३२३ नुसार ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा व ५०० / – रूपये दंड , दंड न भरल्यास १ आठवडयाची साधी कैद , ३७६ ( २ ) ( एन ) सह ३४ नुसार तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ३,४ नुसार एकत्रितपणे दोघा आरोपींना १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ३,००० / – रूपये दंड , दंड न भरल्यास २ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले.

घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिच्या सावत्र आई सोबत मौजे इंदीरा नगर कळमनुरी. जि. हिंगोली येथील राहणारी आहे . तिचे सख्खे आई वडील हे लहान असतानाच वारले होते.

सावत्र आई ही पिडीत मुलगी हिस सतत मारहाण व त्रास देत होती. आरोपी माया आगलावे हिच्या सोबत पिडीत मुलगी हिची जुन २०२० मध्ये ओळख झालेली होती. सावत्र आई सोबत पिडीत मुलींचे वाद झाल्यामुळे ती त्यांच्या गावातील महादेवाच्या मंदीरात जावून बसलेली होती.

माया आगलावे हि तेथे आली व पिडीत मुलीस म्हणाली की, मी तुला तुझ्या आई कडे घेवून जाते व तुला मारू नको असे सांगते असे म्हणून पिडीत मुलीला बऱ्याच गाडया बदलत अहमदनगरला घेवून आली.
नगरला आल्यानंतर पिडीत मुलीस आरोपी निलेश उमाप याच्या मदतीने जबरदस्तीने त्याच्या मोटारसायकलवर बसवून एका खोलीवर घेवून गेले. तेथे गेल्यानंतर दोघा आरोपींनी पिडीत मुलीचे हातपाय बांधले व तिला मारहाण केली. तसेच तिला उपाशीपोटी ठेवून आरडा ओरडा करावयाचा नाही व चुपचाप बसायचे अशी धमकी दिली.

त्यांनतर सतत पिडीत मुलीवर बळजबरी करत अत्याचार करण्यात आले. त्यामुळे पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. दोन्ही आरोपींनी पिडीत मुलीस गोळ्या खायला देवून तिच्या पोटातील गर्भ पाडला.
त्यानंतर अत्याचार करीत असताना पिडीत मुलीने आरडा ओरडा केला. त्यामुळे तेथे राहत असलेल्या लोकांनी पिडीत मुलीचा आवाज ऐकून पिडीत मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली.

पिडीत मुलीला एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी बाल कल्याण समिती, अहमदनगर यांचेकडे मुलीचा ताबा दिला. पिडीत मुलीचा ताबा बाल कल्याण समितीकडे दिल्यानंतर सदर मुलीची चौकशी केल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये फ्रिडम फर्म संस्थेचे समन्वयक संदेश किसन जोगेराव यांनी एम . आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे हजर होवून आरोपींविरुध्द फिर्याद दाखल केली.

एम.आय.डी.सी. पोलिसांनी आरोपी विरुध्द ३७६ ( २ ) ( एन ) सह ३४ व पोक्सो कायदा ४ व ६ नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक पाठक यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकीलांचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी निलेश सुनिल उमाप व माया रमेश आगलावे या दोघाना न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ यांनी सहकार्य केले .

