तुटलेल्या वीजवाहक तारांचा शॉक बसून चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार भावंडांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता.८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिकेत अरूण बर्डे ( वय १२) ओंकार अरुण बर्डे (वय १०) दर्शन अजित बर्डे (वय ८) विराज अजित बर्डे (वय ६) अशी मृत्यू झालेल्या चारीही मुलांचे नावे आहेत.

हातावरचे पोट असणाऱ्या अक्षरशः मोल मजुरी करून जगणाऱ्या बर्डे कुटुंबियांवर हा काळाचा घाला काळीज पिळवटून टाकणारा आहे.
शनिवारी ही चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात (नाल्यामध्ये) आंघोळीसाठी गेले होते. या नाल्यांमध्ये तुटून पडलेल्या वीज वाहक तारांमुळे विजेचा करंट उतरलेला होता. त्याच विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती समजताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे व आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर नागरिकांनी या चारीही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

चारीही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांना अश्रु अनावर झाले होते. तर आई- वडीलांनी हंबरडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारीही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिके पर्यंत नेले.

वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा..
वीज वाहकतारांमुळे चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार-पाच दिवसांपूर्वी वीज वाहक तारा तुटल्या होत्या. संबंधितांना कळविण्यात देखील आले होते. तरीही तो वीज प्रवाह बंद करण्यात आला नाही किंवा त्या तारा काढून घेण्यात आल्या नाहीत. वीज वितरणच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे चार चिमूरड्या जिवांचा बळी गेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी केली आहे.

तुटलेल्या वीज वाहक तारांमुळे या लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या वीजवाहक तारा साधारण चार-पाच दिवसापूर्वी तुटल्या होत्या. त्या दुरुस्त करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली होती. तसे वीज वितरण कंपनीला कळवले असल्याचे देखील समजले. मात्र वीज वितरण कंपनीकडून कुठलेही हालचाल न झाल्याने आजचा दिवस त्या मुलांसाठी मात्र काळरात्र ठरला आहे.

दरम्यान मयत मुलांपैकी दर्शन व विराज चे वडील अजित हौशीराम बरडे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
