दुचाकीला मागून धडक देऊन कार वरचा ताबा सुटला ; भीषण अपघातात २ ठार ३ जखमी
प्रतिनिधी —
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारणे दुचाकीला पाठीमागून धडक देऊन कारचा ताबा सुटल्याने तीन-चार पलट्या खाऊन झालेल्या अपघातात दोन जण जागेवर ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर मोटरसायकल वरील दोघेजण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला.

प्रथमेश विकास कुरकुटे (वय वर्षै २३ रा.कुरकुटवाडी, ता. संगमनेर ), अभिषेक साहेबराव राहणे, ( वय वर्षै २९ रा.चंदनापुरी, ता. संगमनेर ) हे दोघेजण ठार झाले असून विजय तबाजी काळे (रा.पावबाकी, ता.संगमनेर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री प्रथमेश कुरकुटे, अभिषेक राहणे व विजय काळे हे तिघेजण कार क्रमांक एम.एच ०२ सी.व्ही ०६२० हीच्यामधून हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या दिशेने जात होते. टोलनाक्याच्या काही अंतर मागे असतानाच पुढे असणारी दुचाकी क्रमांक एम.पी.४६ एम.जे ०७०९ हीला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. त्यानंतर कारने पलट्या खाल्याने कारमधील प्रथमेश कुरकुटे व अभिषेक राहणे हे दोघेजण ठार झाले असून कार मधील विजय काळे हा गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकीवरील सुनिल रिचा खारटे रा.सुकेवाडी रोड व प्रेम अत्तरसिंग खारटे हे दोघेजण जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर डोळासणे महामार्गाचे साहय्यक पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, नारायण ढोकरे, अरविंद गिरी, संजय मंडलिक, पंढरीनाथ पुजारी, कैलास ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

