धडक दिल्याने बिबट्या कार मध्ये अडकला ! 

चंदनापुरी घाटातील थरार

गंभीर जखमी बिबट्याचे जंगलात पलायन

प्रतिनिधी —

एका कारने बिबट्याला धडक दिल्याने कारचा रेडिएटर जवळचा भाग तटून त्यात बिबट्या अडकल्याने जबर जखमी झाला आहे. अडकलेला बिबट्या काढण्यासाठी कार चालकाने गाडी पुढेमागे केल्याने बिबट्या चांगलाच सोलून निघाला. चिडलेला बिबट्या  कार वर देखील झडप घालत होता. त्यानंतर अचानक सुटका झाल्याने बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली आहे.

आज सायंकाळी हा थरार संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी शिवारात चंदनापुरी घाटात घडला. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अधिक माहिती घेत असून या घटनेला त्यांनी दुजोरा दिला आहे.

ही घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात घडली. पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची कार पुण्यावरून नाशिक कडे जात असताना ही घटना घडली असल्याचे दिसून येत आहे.  सदर कार नादुरुस्त झाल्याने पुन्हा पुण्याकडे नेली असल्याचे समजले आहे.

त्या कारच्या धडकेमुळे बिबट्या कार मध्ये अडकला व त्याची कार मधून सुटका करण्यासाठी धडपड सुरू झाली. यावेळी गाडीचा रेडिएटरच्या समोरील सर्व भाग तुटल्याने बिबट्या त्यात अडकला होता. बिबट्या सुटण्यासाठी धडपडत होता तर आडकलेला बिबट्या सुटावा म्हणून चालक गाडी मागे पुढे घेत होता. त्यात गंभीर जखमी झाला. त्यामुळे चिडलेल्या बिबट्याने कारवर झडप घालून चावा घेण्याचा प्रयत्न केला.

गाडी मागे घेतल्यावर सुटका झाल्याने बिबट्याने रस्त्याच्या कठड्यावरून जंगलात उडी मारत धूम ठोकली. त्यानंतर तो कुठे निघून गेली हे मात्र समजले नाही. वनविभाग जखमी बिबट्या बरोबरच कारचा देखील शोध घेत असल्याची माहिती समजली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!