संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील साई मंदिराकडे जाणारा पूल खचला

प्रतिनिधी —

शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.

शहरात प्रस्तावित असलेल्या एसटीपी प्लांटसाठी आवश्यक असणारी आणि नुकतीच बांधण्यात येत असलेली ड्रेनेजची लाईन देखील तुटली असल्याचे निदर्शनास आले.

संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन या पुलावरून समांतर गेली आहे. आज दुपारच्या वेळी ही पाईपलाईन आणि त्याखालील पुलामध्ये मोठ्या प्रमाणात फट निर्माण झाली असल्याचे दिसून आले.

तसेच पूल देखील काही ठिकाणी खचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हाळुंगी नदीला पाणी असल्याने पुलाच्या खाली असलेली समांतर भिंत देखील या पाण्याच्या प्रवाहामुळे खचली असल्याचे दिसते.

स्थानिक नागरिकांनी याची माहिती तातडीने नगरपालिका प्रशासनाला कळविली. घटनास्थळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. तसेच पुलावरून समांतर गेलेल्या शहराच्या पिण्याच्या पाईपलाईनला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहे. पुलावरून सुरू असलेली वाहतूक पुलाच्या दोन्ही बाजूने अडथळे टाकत बंद करण्यात आली.

यामुळे परिसरातील पंपिंग स्टेशन, साईनगर, घोडेकर मळा या भागातील नागरिकांना दूरवरून शहरात ये-जा करावी लागणार आहे.

तसेच साई मंदिरा शेजारी असलेल्या दिगंबर गणेश सराफ विद्यालय, ओहरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे देखील मोठे हाल होणार असून त्यांना देखील दूरवरून या ठिकाणी यावे लागणार आहे. त्यांची देखील ऐन परीक्षेच्या काळात तारांबळ उडणार आहे. शहरात पूल खचल्याचे वृत्त समजतात नागरिकांनी या परिसरात गर्दी केली होती.

दरम्यान या संदर्भात माहिती मिळताच संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने येथे येत परिस्थितीची माहिती घेतली. घटनास्थळी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या तसेच या ठिकाणी माहितीचा फलक लावण्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या. या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देऊन घटनास्थळी बोलावून घेण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास लोणारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!