पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला नवी गती ; आमदार अमोल खताळ यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट..
संगमनेर | प्रतिनिधी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह झालेल्या या बैठकीत प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणारी चालना तसेच नागरिकांच्या अपेक्षांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली.
बैठकीदरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या संरेखनामुळे खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) संदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. संबंधित जिल्ह्यांतील नागरिक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत असून तो लवकर मार्गी लागावा, अशी लोकभावना असल्याचेही यावेळी मांडण्यात आले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ही समिती प्रस्तावित रेल्वे मार्गाचे संरेखन आणि GMRT वर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली.
या घडामोडींमुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नव्याने गती मिळण्याची आशा निर्माण झाली असून, हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

आमदार अमोल खताळ म्हणाले…
> “पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. या प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीमुळे तांत्रिक मुद्द्यांवर योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा बहुप्रतीक्षित प्रकल्प लवकरच मार्गी लागेल आणि नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच संगमनेर परिसरातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होईल.”
