शिक्षणातील पेपरफुटी – सरकारी भरतीनंतर खासगी क्षेत्रातही फसवणुकीचे जाळे
आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधीद्वारे गंभीर मुद्दा केला उपस्थित
पुण्यात आयटी कंपन्यांच्या नावाने बनावट कागदपत्रांचे रॅकेट ; बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शिक्षणातील पेपरफुटी आणि सरकारी भरतीतील घोटाळ्यांनंतर आता खासगी क्षेत्रातही बेरोजगार तरुणांची संघटित पद्धतीने फसवणूक होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. पुण्यात आयटी कंपन्यांच्या नावाने बनावट अनुभव प्रमाणपत्रे, पगाराच्या स्लिप, पीएफ कागदपत्रे, फॉर्म-१६, आयकर रिटर्न, बँक स्टेटमेंट यांसारखी बनावट कागदपत्रे तयार करून लाखो रुपये उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड आणि नियुक्तीपत्रे देऊनही बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा मुद्दाही सभागृहात मांडण्यात आला.

पुणे हे राज्यातील प्रमुख आयटी केंद्र असल्याने राज्यभरातून हजारो तरुण रोजगाराच्या आशेने येथे येतात. मात्र, अनुभव नसल्याचा गैरफायदा घेत काही संघटित टोळ्या बनावट अनुभव प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांचा संपूर्ण संच तयार करून लाखो रुपये उकळत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पडताळणीदरम्यान बनावट कागदपत्रांचा भांडाफोड झाल्यानंतर फसवणूक करणारे फरार होतात, तर निरपराध तरुण अडचणीत सापडतात.
यावेळी आमदार तांबे यांनी सभागृहात पुढील मागण्या केल्या
बनावट अनुभव प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या रॅकेटविरोधात गृह विभागाने विशेष मोहीम राबवावी.
पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी.
भीतीपोटी तक्रार न करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र पोलिसांची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी.
पुणे शहरात अशा प्रकारचे किती गुन्हे कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत, याची माहिती एका महिन्यात सभागृहाच्या पटलावर ठेवावी.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित सर्व प्रकरणांची माहिती संकलित करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पुणे पोलिसांकडून अशा गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

