संगमनेर युवक काँग्रेसचे पदाधिकारी फक्त मिरवण्यासाठीच ? संघटनात्मक कामात निष्क्रियतेची चर्चा !
डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाला लढाऊ आणि सक्रिय टीमची गरज ; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
संगमनेर | प्रतिनिधी –
संगमनेर शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षातीलच निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अनेक पदाधिकारी पक्षाच्या आंदोलनांमध्ये, जनतेच्या प्रश्नांवरील लढ्यांमध्ये आणि संघटनात्मक कामात सक्रिय दिसत नसल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पदे घेऊन केवळ वरिष्ठ नेत्यांसोबत छायाचित्रे काढणे, ती सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष संघटनात्मक कामापासून दूर राहणे, एवढ्यापुरतीच काहींची भूमिका मर्यादित राहिली आहे.

विशेष म्हणजे, वडगाव पान येथील बालिकेवरील ॲसिड हल्ला, नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरण, महिलांवरील अन्याय तसेच इतर अनेक सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर तालुका अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि संबंधित प्रश्नांवर प्रत्यक्ष कृतीही केली. मात्र, या महत्त्वाच्या विषयांवर युवक काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांची ठोस भूमिका, आंदोलन किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया फारशी दिसून आली नाही, असेही बोलले जात आहे.
तालुका अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत असल्या तरी, त्यांच्या पाठीशी रस्त्यावर उतरून लढणारी, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारी युवक काँग्रेसची सक्षम टीम उभी राहणे आवश्यक असल्याचे मत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

संगमनेर शहरासह तालुक्यात युवक काँग्रेसचे संघटन अपेक्षित ताकदीने उभे राहिलेले दिसत नसल्याने पक्षाच्या भविष्यातील विस्तारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची मागणी आहे की, पदाधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल मागवून निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि संघटनेत सक्रिय, संघर्षशील व जनतेत काम करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी.
