गटातटाच्या राजकारणामुळे संगमनेर भाजपमध्ये मरगळ,

जनआंदोलने थंडावली !

 संगमनेर प्रतिनिधी –

अहिल्यानगर जिल्ह्यामधील राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा संगमनेर भाजपमध्ये सध्या कमालीची मरगळ आल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत वाढलेली गटबाजी, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि स्थानिक आमदारांच्या कार्यशैलीवर असलेली तीव्र नाराजी यामुळे भाजपचे संघटन पुरते विखुरले गेले असून, पक्षीय कामाला कमालीची संथपणा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही काळापासून संगमनेर भाजपमध्ये एकसंधतेचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. पक्ष वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचे, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला असून, यामुळे पक्षाच्या नियमित उपक्रमांचा आणि संघटनात्मक कामांचा वेग मंदावला आहे.

पक्षाला तळागाळात पोहोचवण्यात ज्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता, तेच आता सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे किंवा त्यांना बाजूला सारले गेल्याचे बोलले जात आहे. अनुभवी नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळेनासे झाले असून, संघटनात्मक पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्थानिक पातळीवर भाजपच्या प्रमुख नेतृत्वाच्या व आमदारांच्या कार्यपद्धतीवर अंतर्गत वर्तुळात नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, निर्णय प्रक्रियेत केवळ मोजक्याच लोकांना स्थान देणे यामुळे पक्षातील एक मोठा वर्ग नाराज असून, ही नाराजी आता बोलून दाखवली जात आहे.

या सर्व अंतर्गत सुंदोपसुंदीचा थेट फटका पक्षाच्या प्रतिमेला बसत आहे. एकेकाळी जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि स्थानिक समस्यांवरून रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने करणारी भाजप आता शांत झाली आहे. जनतेच्या हक्कासाठी होणारी आंदोलने पूर्णपणे बंद झाल्यामुळे, भाजप सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

“वरिष्ठ पातळीवरून जर या गटबाजीला वेसण घातली गेली नाही आणि नाराज ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले नाही, तर आगामी काळात भाजपला याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो,” अशी भीती पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते संगमनेरमधील ही मरगळ झटकण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!