मवेशी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरण
एसआयटी चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार – पालकमंत्री विखे पाटील
अकोलेच्या आढावा बैठकीत गंभीर भूमिका, पाणीपुरवठा, अपूर्ण योजना, निकृष्ट विकासकामांवरही अधिकाऱ्यांना फटकार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अकोले तालुक्यातील मवेशी (राजूर) शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट करत प्रशासनाला कठोर शब्दांत सूचना दिल्या.

बैठकीत आदिवासी भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, अपूर्ण योजना, निकृष्ट दर्जाची कामे आणि नागरिकांच्या तक्रारींवर सखोल चर्चा झाली. देवठाण पाणीपुरवठा योजनेतील तक्रारींची चौकशी, अपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा, लहीत खुर्द येथील पाझर तलावाच्या गुणवत्तेची चौकशी तसेच धामणगाव आवारी पाइपलाइन प्रकरणात तातडीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.
विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना वेळेवर पाणी मिळालेच पाहिजे. टँकर नियोजनात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने गावपातळीवर प्रभावी नियोजन करून नागरिकांची गैरसोय टाळावी.

यावेळी आदिवासी विकास विभागाच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावाही घेण्यात आला. कळंबसह रेड झोनमधील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.
“कामात दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि नागरिकांच्या तक्रारी याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक विभागाचा नियमित आढावा घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल,” असा इशाराही विखे पाटील यांनी बैठकीत दिला.
