पेमगिरीच्या ऐतिहासिक वटवृक्षाखाली रंगणार ‘उत्सव माझ्या कुंकवाचा’

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ; रणरागिनींचा होणार सन्मान

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील स्वराज्य संकल्पभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेमगिरी येथील ऐतिहासिक व महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ‘उत्सव माझ्या कुंकवाचा – वटसावित्री पौर्णिमेचा’ हा आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी (दि. २९) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ, पेमगिरी, आदिशक्ती फाउंडेशन, संगमनेर आणि महायुती महिला आघाडी, संगमनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, वटसावित्री पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, धनश्री विखे पाटील तसेच नीलमताई खताळ पाटील यांच्या हस्ते समाज, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिनी महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

महिलांच्या मनोरंजनासाठी साई म्युझिक प्रस्तुत ‘सारेगमप’ ऑर्केस्ट्रा तसेच भक्तिमय गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

पेमगिरीच्या ऐतिहासिक वटवृक्षाच्या साक्षीने होणाऱ्या या कार्यक्रमास संगमनेर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन आणि महायुती महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!