वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ११०० वटवृक्षांचे रोपण

दंडकारण्य अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर | प्रतिनिधी

दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यात तब्बल ११०० वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खांडगाव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा तथा कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी अर्चनाताई बालोडे, कमल आरगडे, लक्ष्मीबाई गुंजाळ, वंदना गुंजाळ, अरुणा गुंजाळ, संगीता गुंजाळ, शाहिदा शेख, सुरेखा खरे, आशा सिनारे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या.

तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडी-वस्तीवर वटवृक्षांचे रोपण करून पूजन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटसावित्री साजरी करत निसर्गगीतांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दंडकारण्य अभियान आज जनआंदोलन बनले आहे. वड, पिंपळ, उंबर, आंबा, कडूनिंब, चिंच यांसारख्या देववृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पुढील पिढ्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन करावे.”

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला समजले. मात्र पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे वाढती उष्णता व अनियमित पावसासारख्या समस्या निर्माण होत आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. निरोगी जीवनासाठी चांगले पर्यावरण, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”

‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खंडेश्वर मंगल कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्या वतीने गोकुळ राहणे व वंदना राहणे निर्मित ‘खेळ पैठणीचा’ हा संगीतमय मनोरंजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात ४०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.

पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी संगीत खुर्ची, विविध गीते, मनोरंजक खेळ आणि हास्यविनोदाचा मनमुराद आनंद लुटला. उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेला हा कार्यक्रम उपस्थित महिलांसाठी अविस्मरणीय ठरला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!